नोटाबंदीने मुंबई मटका लटकला

सुधाकर काशीद 
सोमवार, 5 डिसेंबर 2016

कोल्हापूर - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याचा काळ्या पैशावर, पांढरपेशांच्या काळ्या व्यवहारावर नेमका काय परिणाम झाला हे माहिती नाही; पण मुंबई मटक्‍यावर मात्र त्याचा परिणाम झाला आहे. गेले 25 दिवस मुंबई मटका पूर्ण बंद असून, मटका अड्ड्यांना कुलपे लावली गेली आहेत.

कोल्हापूर - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याचा काळ्या पैशावर, पांढरपेशांच्या काळ्या व्यवहारावर नेमका काय परिणाम झाला हे माहिती नाही; पण मुंबई मटक्‍यावर मात्र त्याचा परिणाम झाला आहे. गेले 25 दिवस मुंबई मटका पूर्ण बंद असून, मटका अड्ड्यांना कुलपे लावली गेली आहेत.

पाचशे, हजाराच्या हिशेबाचा फटका या मटक्‍याला बसला असल्याची चर्चा आहे. मात्र, याच वेळी पहिले चार-पाच दिवस विस्कळित झालेल्या कल्याण मटक्‍याचे व्यवहार दबकत दबकत सुरू झाले आहेत. काळ्या धंद्याच्या विश्‍वात शब्दाला महत्त्व असते, असे म्हटले जाते. कल्याण मटक्‍याच्या तुलनेत मुंबई मटक्‍याचा शब्द काळ्या धंद्यात पत टिकवून आहे. त्यामुळे मुंबई मटका बंदचे पडसाद काळ्या धंद्यावर उमटले आहेत.

राज्यातील मटकाविश्‍वात कोल्हापूरच्या मटका व्यवहाराची उलाढाल मोठी आहे. शहराची, ग्रामीण भागाची हद्द वाटून घेऊन मटका व्यावसायिकांनी आपापली यंत्रणा उभी केली आहे. हद्दीवरून त्यांच्यात जरूर कुरबुरी आहेत; पण सर्व यंत्रणांना खूश ठेवून मटका चालू राहील यावर त्यांचे एकमत आहे.

सर्वाधिक रक्‍कम ज्या आकड्यावर लावली गेली आहे, तो आकडा कधीच फुटणार नाही. याचे तंत्र फक्‍त या मटका व्यावसायिकांत आहे. त्यामुळे शंभरातले 80 रुपये स्वत:साठी व 20 रुपये मटका शौकिनांसाठी, याच प्रमाणात हा व्यवसाय चालू आहे. त्यामुळे मटकावाल्यांकडे रोज पोते भरून पैसा गोळा होतो, हे वास्तव आहे आणि अशा पैशाचाच हिशेब सुरळीत झाला नसल्याने मुंबई मटका बंद झाला आहे. अर्थात, तो पुन्हा सुरूच होणार नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.

मटक्‍यात शब्दाला महत्त्व, साध्या चिठ्ठीवरही पेमेंट केले जाते, असा साळसूद आव आणला जात असला तरीही हा जुगार बनावट आहे. 100 रुपयातले 80 रुपये मटकेवाल्याचे, हेच या धंद्याचे गणित आहे. उरलेल्या 20 रुपयांत इतरांचे नशीब कमी-अधिक प्रमाणात पूर्ण केले जाते. मटका खेळणाऱ्यांपैकी 80 टक्‍के जणांच्या वाट्याला अपयश याचमुळे येते. मटका खेळणाऱ्यांच्या कुटुंबाची याचमुळे धूळधाण होते. याउलट मटकेवाल्यांच्या घरात मात्र पैशाची थप्पी लागत राहते. आता याच थप्पीचा हिशेब पूर्ण होईपर्यंत मुंबई मटका बंदची चर्चा आहे.

मटका व्यवसायात कोल्हापूरची उलाढाल मोठी असल्याने मध्यंतरी कोल्हापुरातच मटका फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मटका फोडणे हा प्रकार कधी काळी जाहीरपणे होत असेलही; पण आता ओपन व क्‍लोजला कोणता आकडा काढायचा हे ठराविक मटका व्यावसायिकच ठरवतात आणि ज्या आकड्यावर बहुसंख्य लोकांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे तो सोडून दुसराच आकडा काढतात. या प्रक्रियेत जराही पारदर्शीपणा नाही. लोकांना उल्लू बनवण्याचा हा मोठा कट आहे. पण मटक्‍याचा एकदा नाद लागला की तो सहज सुटणे कठीण असल्याने मटकावाल्यांचे फावले आहे.
आता प्रथमच कोणत्याही पोलिस कारवाईला भिऊन नव्हे, तर वरतीच मटका बंद ठेवल्याने मुंबई मटक्‍याचे व्यवहार बंद आहेत. अर्थात, कल्याण मटका फोनवरून चालू आहे. पोलिसांनी आता ही संधी साधण्याची गरज आहे. आता पुन्हा मुंबई मटका सुरू होणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली तरच मटका अड्ड्यांना तूर्त लागलेली कुलपे पुढेही तशीच कायम राहतील.

सोने खरेदी हुकली
कोल्हापुरात मुंबई मटका चालवणाऱ्यांकडे मोठा पैसा आहे. त्यांनी 8 तारखेला रात्री हे पैसे सोन्यात गुंतवण्यासाठी सोने खरेदीची यंत्रणा राबवली होती; पण इथल्या बहुतेक सराफांनी दुकाने बंद, मोबाइल बंद ठेवून या व्यवहारात गुंतणार नाही, याची खबरदारी घेतली होती.

राजधानी मटका सुरू
मुंबई मटक्‍याला पर्याय म्हणून रात्री राजधानी मटका सुरू झाला आहे. लक्ष्मीपुरीतील मटका अड्ड्यावर त्याचे प्रॉस्पेक्‍टस्‌ (माहिती पत्रके) आहेत. पण राजधानी मटका कोण चालवतो, कोण फोडतो हे माहिती नाही, त्यामुळे त्याचा जम बसलेला नाही. मात्र, पुन्हा मुंबई मटका सुरू करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगावमधील मटका व्यावसायिकांनी पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे.

Web Title: mumbai matka problem by currency ban