महापालिकेचाही पदभार  पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे? 

Municipal corporation again in charge of the Collector?
Municipal corporation again in charge of the Collector?

नगर : महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची सूत्रे 1 डिसेंबरपासून पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी पदभार घेणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने पदाधिकारी आणि प्रशासन पुन्हा तणावग्रस्त झाले आहे. नगर महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करण्यास राज्यातील बहुतेक सगळेच अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे पुढील किती दिवस नगरचे आयुक्तपद प्रभारी असेल, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

नगर महापालिकेतील राजकीय व आर्थिक स्थितीची ओळख राज्यभरातील सर्व सनदी अधिकाऱ्यांना झाली आहे. त्यामुळे महापालिकेत येण्यास सनदी अधिकारी तयार होत नाहीत. गेल्या दीड वर्षापासून नगर महापालिकेतील अपर आयुक्‍तांची खुर्ची त्यामुळेच रिक्‍त आहे. मध्यंतरी बरेच दिवस आयुक्‍त व दोन्ही उपायुक्‍तांच्या खुर्च्याही रिक्‍त होत्या. सेवानिवृत्तीला काही महिनेच बाकी असलेले अधिकारी नगरमध्ये सक्‍तीने पाठविले जातात. हे अधिकारी पदभार स्वीकारताच निम्मा कालावधी रजेवरच असतात. त्यामुळे महापालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती जातो. 

घन:श्‍याम मंगळे सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमारे सहा महिने आयुक्‍तपद रिक्‍त होते. त्या वेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच महापालिकेचा पदभार यशस्वीपणे सांभाळला. त्यात महापालिकेची निवडणूक देखील शांततेत करून दाखविली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त व वेळेच्या नियोजनाचे धडे कृतीतून दिले. पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्याचा वचक कळला. सीना नदीचा श्‍वास मोकळा झाला होता. 

आता पुन्हा महापालिकेचे आयुक्‍तपद एक डिसेंबरपासून रिक्‍त होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. यात प्रशासकीय कामे वाढली आहेत. महापालिकेत आयुक्‍तपदावर येण्यासाठी अधिकारी तयार होत नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे महापालिकेचा पदभार पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे जाण्याची शक्‍यता आहे. 

नगररचनेचा कारभारही येणार ऐरणीवर 
महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी नगररचना विभागातील नऊ लिपिक व चार शिपायांची तीन महिन्यांपूर्वी तडकाफडकी बदल्या केल्या. प्राप्त तक्रारींवरुन या बदल्या केल्या, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्यात दबावाचे राजकारण असल्याची चर्चा आहे. बदल्या प्रकरणांमुळे या विभागाच्या कारभारावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे येथील कारभाराची घडी बसविण्याचे महत्वाचे काम येणाऱ्या आयुक्तांना करावे लागेल, अशीच स्थिती आहे. त्यातही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी येथील पदभार स्वीकारलाच तर प्रशासन पुन्हा सुतासारखे सरळ होईल, अशी नगरकरांची अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com