‘राष्ट्रवादी’ ने २० जागा घ्याव्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ जागांच्या मागणीला काँग्रेसने अवघ्या २० जागा देण्याचा प्रस्ताव देत आघाडीच्या चर्चेला थंडा प्रतिसाद दिला. सहयोगी नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे सभागृहात २५ सदस्यांचे बळ असताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी प्रस्ताव तत्काळ फेटाळला. सुधारित प्रस्ताव द्या, अन्यथा स्वबळाचा पर्याय खुला आहे, असा इशारा दिला. त्यामुळे दोन्ही गटांतील मानापमान नाट्याला प्रारंभ झाल्याचे चित्र तयार झाले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतःहून आघाडीचा प्रस्ताव देत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांपासून सर्वांचाच काही दिवसांपासून थंडा प्रतिसाद आहे. स्थानिक पातळीवर जागा वाटपावर एकमत झाल्यास आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राष्ट्रवादीने पहिल्यांदा ७८ पैकी ३८ जागांचा प्रस्ताव दिला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज राष्ट्रवादीने २० जागा घ्याव्यात, असा प्रस्ताव दिला. त्यांच्या प्रस्तावाचे तीव्र पडसाद आज राष्ट्रवादीत उमटले. चिन्हावर १९ निवडून आलेत. तर सहा अपक्षांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. काँग्रेसकडेही सध्या सभागृहात ४१ संख्याबळ आहेत. आणखी  तिघांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले. 

जागावाटपाचे नेमके सूत्र काय असावे यावर दोन्ही  बाजूला संभ्रमावस्था आहे. सध्या तरी दोन्ही काँग्रेसमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचेच चित्र आहे.

जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आघाडी व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. याचा अर्थ आम्ही  कमजोर आहोत असा काँग्रेसने घेऊ नये. सुधारित  प्रस्ताव द्यावा, त्यावर चर्चा करू अन्यथा आम्हाला आमच्या वाटा मोकळ्या आहेत.
- संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी 

काँग्रेसचा जनाधार विचारात घेऊन राष्ट्रवादीने जागा मागाव्यात. जनता दलास व अन्य समविचारी पक्षांनाही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे राष्ट्रवादीला दिलेला सध्याचा प्रस्ताव योग्य आहे. त्यांचे लेखी म्हणणे आल्यावर त्यावर चर्चा होऊ शकते.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Municipal Election Congress NCP Politics