पालिका चालविता की गोठा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी उपाययोजना करण्यात हयगय होत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कानउघाडणी केली. 

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी उपाययोजना करण्यात हयगय होत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कानउघाडणी केली. 

इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील माहिती देत असतानाच तुम्ही खोटे सांगत आहात. तुम्हाला प्रदूषण रोखता येत नाही. नगरपालिका चालविता का गाईचा गोठा, असे म्हणत वेळप्रसंगी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा दमही कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला.
पंचगंगा नदी प्रदूषणसंदर्भात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज शासकीय विश्रामगृह येथील शाहू सभागृहात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याचा आढावा कदम यांनी घेतला. 

प्रथम त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना महापालिकेने काय कारवाई केली, असा प्रश्‍न केला. आयुक्त चौधरी म्हणाले, कसबा बावडा येथील एसटीपी कार्यान्वित असून तेथे ५५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. दुधाळी नाल्यावरील एसटीपीची चाचणी झाली असून दहा दिवसांत हा एसटीपी सुरू करू. बापट कॅम्प आणि लाईनबाजार नाल्याचे पाणी एसटीपीकडे वळविण्याचे काम सुरू आहे. एकूण ९० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ही सर्व माहिती लिहून घेतली. त्यानंतर त्यांनी आयुक्तांची उलटतपासणी घेतली. जयंती नाल्याचे पाणी थेट नदीत मिसळत आहेत. तुम्ही सांगितलेली सगळी आकडेवारी खोटी आहे. ती फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्षात मी पाहणी केली आहे. सर्व प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. यावर आयुक्‍त चौधरी तसेच जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी मंत्र्यांना पावसामुळे नाल्यात पाण्याचे प्रमाण वाढल्याने हे पाणी मिसळत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. पण कदम यांनी पाऊस कोठे आहे, काहीही सांगू नका. एक थेंबही पाणी नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घ्या. अन्यथा थेट कारवाईला सामोरे जा, असा दमही त्यांनी दिला.

तुम्ही पिता का ते पाणी - कदम
जलअभियंता सुरेश कुलकर्णी हे उपाययोजनांची माहिती सांगत होते. पावसाळा असल्याने हे पाणी आता थेट नदीत मिसळत आहे. इतर वेळी आम्ही ते उपसा करून एसटीपीकडे वळवितो, असे कुलकर्णी सांगताच पर्यावरणमंत्री कदम खवळले. लोकांना सांडपाणी पाजता, लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तुम्ही पिता का ते पाणी, असे म्हणत कुलकर्णी यांना धारेवर धरले. आंदोलक वेडे आहेत का? तुम्ही कायमस्वरूपी उपाययोजना करा. अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील.

Web Title: municipal panchganga pollution ramdas kadam