नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना पोलिसांनी रुग्णवाहिकेतून पळविले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

शवविच्छेदन "घाटी'त 
दरम्यान, गोळ्या झाडून खून करण्यात आलेला असल्याने दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे घेण्यात आला. त्यानुसार रात्री (ता.28) उशिरा रुग्णवाहिकेतून मृतदेह औरंगाबदला पाठविण्यात आले होते. 

नगर : जामखेडमधील दुहेरी खुनाच्या पार्श्‍वभूमीवर चौकशीसाठी नगरचे पालकमंत्री राम शिंदे रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात पोचले. तेथे त्यांना संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेरीस जमाव शांत होत नसल्याने त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी शिंदे यांना पोलिसांनी अक्षरश: रुग्णवाहिकेतून पळविले.

संतप्त झालेल्या जमावाने शिंदे यांना तब्बल दीड तास जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातील मुख्य इमारतीमध्ये कोंडले होते. सुरुवातीला पोलिसांनी पालकमंत्री शिंदे यांना बळाचा वापर करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून जमाव नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी जमावाला गाफील ठेवून शिंदे यांचा रुग्णालयाच्या मागील दरवाजातून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून पळविले. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवक कार्यकर्ते रॉकी ऊर्फ राकेश राळेभात या दोघांची काल (ता. 28) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामखेडमधील बाजार समिती कॉम्प्लेक्‍ससमोर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातर्फे सागंण्यात आले. त्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात आणले होते. त्या वेळी घटनेची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात पोचलेल्या पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री शिंदे यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

शिंदे यांचा रुग्णालयात आल्याचे पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला. त्यांनी शिंदे यांच्या नावाने शिवराळ भाषेत शिविगाळ सुरु केली. जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांनीच शिंदे यांना रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये घेऊन दरवाजाला कुलूप लावले होते. 

शवविच्छेदन "घाटी'त 
दरम्यान, गोळ्या झाडून खून करण्यात आलेला असल्याने दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे घेण्यात आला. त्यानुसार रात्री (ता.28) उशिरा रुग्णवाहिकेतून मृतदेह औरंगाबदला पाठविण्यात आले होते. 

Web Title: murder case in Jamkhed guardian minister Ram Shinde visit place