नगर : पोलिस निरीक्षकासह अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

बहुचर्चित शेवगाव येथील हरवणे कुटुंबाच्या हत्याकांडातील संशयित आरोपी अमोल ऊर्फ संतोष ईश्वर पिंपळे (वय 21, रा. गिडेगाव, ता. नेवासे) याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह अकरा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सीआयडी तपास सुरू आहे.

नेवासे (नगर) : बहुचर्चित शेवगाव येथील हरवणे कुटुंबाच्या हत्याकांडातील संशयित आरोपी अमोल ऊर्फ संतोष ईश्वर पिंपळे (वय 21, रा. गिडेगाव, ता. नेवासे) याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह अकरा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सीआयडी तपास सुरू आहे.

नेवासे पोलिसांनी आरोपी पिंपळेला 18 ऑगस्ट 2017 रोजी शेवगाव येथील हरवणे हत्याकांडप्रकरणी अटक केली होती. तो पोलिस कोठडीत असताना 23 ऑगस्ट रोजी पहाटे 5.30च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला होता. कस्टडी क्रमांक 3 मधील इतर अकरा आरोपी झोपलेले असताना आरोपी पिंपळेने दोन टॉवेल एकत्र करून गळफास घेतला होता.

पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा पिंपळेच्या नातेवाइकांनी आरोप केला होता. त्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

दरम्यान, त्याची पत्नी पुष्पा (वय 40) हिने या प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली. याबाबत न्यायालयाने गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावरून लोखंडेंसह अकरा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास शेवगाव विभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्याकडे आहे.

पिंपळेवर नेवासे तालुक्‍यात घरफोडी, दरोडे, तसेच रस्तालूटचे 11 गुन्हे दाखल आहेत. नाशिक जिल्ह्यात 2, तसेच शेवगाव तालुक्‍यात 1 गुन्हा दाखल आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा
भिंगारे, जांभळे, पवार, सुनील चव्हाण, लांबडे, गायकवाड, तायडे, खिल्ले, भिंगारदिवे, शेकडे व प्रवीण लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder charges against a police inspector