सांगलीत मेहुण्यांनी केला भावजीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

एक नजर

  • सांगली शहरातील मध्यवस्तीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदीजवळ मेहुण्यांकडून भावजीवर चाकूने हल्ला
  • जमीर रफिक पठाण (वय 55, रा. पेन, पनवेल) असे त्या मृत भावजीचे नाव
  • या प्रकरणी जमीर यांचे मेहुणे आलीम सलिम पठाण (वय 30 ) व शाहरुख सलिम पठाण (वय 27, रा.अलअमिन शाळेजवळ) या दोघांविरोधात गुन्हा
  • मृत जमीर यांचा मुलगा युसुफ पठाण याची सांगली शहर पोलिसांत फिर्याद. 

सांगली - शहरातील मध्यवस्तीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदीजवळ दोघा मेहुण्यांनी चाकूने हल्ला करून भावजीचा निर्घृण खून केला. जमीर रफिक पठाण (वय 55, रा. पेण, पनवेल) असे त्या मृत भावजीचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

याप्रकरणी प्रकरणी जमीर यांचे मेहुणे आलीम सलिम पठाण (वय 30 ) व शाहरुख सलिम पठाण (वय 27, रा. अलअमिन शाळेजवळ) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती कारणावरून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मृत जमीर यांचा मुलगा युसुफ पठाण याने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली. 

अधिक माहिती अशी की, जमीर यांचा पेण येथे हॉटेलचा व्यवसाय आहे. ते कुटूंबासह तेथेच राहतात. पंधरा दिवसांपूर्वी ते मेहुणीच्या लग्नासाठी सांगलीत आले. संशयित आलिम व शाहरुख याच्या घराशेजारीच ते रहात होते. आलिम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मिरजेतील एका क्‍लबमध्ये झालेल्या खूनाचा गुन्हा दाखल होता. त्यात त्याला अटकही झाली होती. तो कारागृहात असताना त्याच्या मुलाचा सांभाळ बहिणींनी केला होता. या खूनातून तो निर्दोष सुटला.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचा मुलगा आलीमजवळ जात नव्हता. तो त्याच्या बहिणीकडेच रहात होता. याचा आलीमला राग होता. मुलगा आपल्याकडे का येत नाही यातून बहिणीशी वादही होत होते. 

मध्यारात्री रात्री एकच्या सुमारास याच कारणावरून त्याचा जमीर यांच्याशी वाद झाला. जमीर यांनी "रात्री कशाला वाद घातलोत, सकाळी बघू', असे समजावूनही सांगितले. पण वाद टोकाला गेल्यामुळे इतर नातेवाईकांनी हा वाद थांबविण्याचाही प्रयत्न केला. यावेळी संशयित आलीम याचा भाऊ शाहरूखही तिथे होता. तर जमीर यांचा मुलगा युसुफ यानेही आलिमला अडविण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, आलिम याने चाकूने जमीर यांच्यावर हल्ला केला. चाकूचा वार जमीर यांच्या छातीवर बसला. रक्‍त्याच्या थारोळ्यात पडलेल्या जमीर यास मोटारसायकलवरून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान, पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आलीम व त्याचा भाऊ शाहरुख या दोघांनी पलायन केले.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताच्या शोधासाठी तातडीने तीन पथके रवाना करण्यात आली आहे. 

मदत करूनही काढला काटा 
या प्रकरणातील मुख्य संशयित आलीम पठाण याच्यावर मिरज शहर पोलिसात खूनाचा दाखल होता. तो कारागृहात असताना जमीर पठाण यांनी त्याला सर्व ती मदत केली होती. खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतरही जमीर यांनी आलीम याला आपल्या हॉटेलमध्ये काम दिले होते. त्याच आलीम याने त्याच्या मदतीला धावणाऱ्या भावजीचा खून केला, याची चर्चा परिसरात होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder incidence in Sangli