सासूवरील रागातून चिमुकल्याचा खून 

Ranjeet pawar murder in malkapur
Ranjeet pawar murder in malkapur

मलकापूर - येथील आगाशिवनगर झोपडपट्टीमध्ये सासूवरील रागातून जावयाने सात वर्षांच्या मेव्हण्याचा खून केला. शनिवारी (ता. 10) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी सागर शंकर जाधव (जावई) (वय 32, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर) याच्यावर खून प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. रणजित ऊर्फ निरंजन मुकेश पवार (वय 7, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. 

या प्रकरणी रणजित ऊर्फ निरंजन पवार याची आई अनिता मुकेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, आगाशिवनगरातील दांगटवस्तीमध्ये अनिता पवार या पती व मुलांसह राहतात. तेथून जवळच त्यांची मुलगी व जावई राहतात. अनिता या मेसचे डबे तयार करण्याबरोबरच टेलरिंगचे काम करतात. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या कामावरून घरी आल्या. तेव्हा रणजित हा घराजवळ खेळत होता. त्यानंतर साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी येऊन रणजित हा पुन्हा खेळण्यास बाहेर गेला. यावेळी तो सागरच्या घराकडे त्यांच्या मुलाबरोबर खेळत होता. रात्री सात वाजण्याच्या सुमारास अनिता या रणजितला घरी बोलावण्यासाठी जावयाच्या घराजवळ गेल्या. तेथे तो दिसला नाही. त्यामुळे अनिता यांनी सागरला रणजितबाबत विचारले. परंतु, सागरने काहीच सांगितले नाही. रणजित कोठेच दिसत नाही, हे लक्षात आल्यानंतर अनिता यांनी पतीला सांगितले. त्यानंतर सर्वचजण त्याचा शोध घेऊ लागले. 

दरम्यान, रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोनाली ही कामावरून घरी आली. रणजित बेपत्ता असल्याचे समजताच तिनेही त्याचा शोध सुरू केला. पाठीमागील भिंतीकडेला रणजित लपून बसला आहे का? हे बघूया, असे सागर म्हणाला. त्यावरून त्याच्यासह मुकेश हे रणजितला शोधण्यासाठी भिंतीच्या बाजूला गेले. तेथे भिंतीलगत रणजित बेशुद्ध अवस्थेत पडलेला त्यांना दिसला. मुकेश यांनी त्याला दोन्ही हातावर उचलून घेऊन घरासमोर आणले. त्यावेळी रणजितच्या चेहरा, कपाळ, डोके, गाल, कानावर लहान-मोठ्या जखमा असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्वरित दुचाकीवरून रणजितला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे सागरनेच त्याचा खून केला असल्याचा संशय व्यक्त करून अनिता यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले आहे. गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे तपास करीत आहेत. 

तिघांनाही मारण्याची धमकी 
अनिता यांची मुलगी सोनाली हिचा दहा वर्षांपूर्वी सागर याच्याशी प्रेमविवाह झाला होता. हा प्रेमविवाह अनिता यांना मान्य नसल्याने तेव्हापासून त्यांच्यामध्ये भांडण होते. त्यामुळे अनिता व रणजित यांच्याविषयी सागरच्या मनात राग होता. त्यातच सागरला दारूचे व्यसन आहे. काही दिवसांपूर्वी वडापावमधून विष घालून रणजितसह अनिता व मुकेश यांना मारणार असल्याचे सागरने पत्नीला सांगितले होते. ही बाब सोनालीने आईला सांगितली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com