कोल्हापूर: मुरगूड बसस्थानकावर 'व्यापारी संकुला'चा प्रस्ताव; परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील

प्रकाश तिराळे
गुरुवार, 6 जुलै 2017

कागल तालुक्‍यातील मुरगूड येथील विस्तीर्ण बसस्थानकाच्या आवारात भव्य बहुमजली व्यापारी संकुल उभारण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे संकेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

मुरगूड (जि. कोल्हापूर) - कागल तालुक्‍यातील मुरगूड येथील विस्तीर्ण बसस्थानकाच्या आवारात भव्य बहुमजली व्यापारी संकुल उभारण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे संकेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले आहेत. मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी केली होती.

यावेळी बोलताना रावते म्हणाले, एसटीचे बसस्थानक हे त्या शहराच्या मध्यभागी असल्याने व्यापाराच्या दृष्टीने बसस्थानक व परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. खाजगी विकसकामार्फत बसस्थानकाच्या परिसरात व्यापारीकरणाच्या दृष्टीने विकास करण्याच्या अनेक संकल्पना एसटी महामंडळाला आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. किंबहुना अशा प्रकारची अनेक व्यापारी संकुले महाराष्ट्रातील विविध बसस्थानकावर यापूर्वी बांधण्यात आली आहेत, परंतु बसस्थानकावर येणाऱ्या एसटी बसेस व प्रवाशांच्या सोई- सुविधांचा परिणामकारक विचार काही योजनांमध्ये झाला नसल्याचे आम्हाला जाणवले आहे. त्यामुळे भविष्यात बसस्थानकाचे महत्व कमी न होता, प्रवाशी व एसटी बसेसची सुरक्षितता लक्षात घेऊन उर्वरित जागेवर सर्व सोयीनीयुक्त अशी व्यापारी संकुले उभारण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. जेणेकरून बसस्थानकाचे मूळ स्वरूप न बदलता त्याला पूरक व्यवसायाचे व्यापार-केंद्र बसस्थानक परिसरात विकसित करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्यादृष्टीने मुरगूड बसस्थानक परिसरातील विनावापर जागेवर "व्यापारी संकुल" उभा करण्याबाबतची शक्‍यता महामंडळ स्तरावर तपासून बघण्यात येईल व भविष्यात एक चांगले बसस्थानक व व्यापारी -केंद्र म्हणून या परिसराचा विकास करण्याचा आपला प्रयत्न असेल असे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी बोलताना राजेखान जमादार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी वर्षांपूर्वी विकसित केलेल्या बाजारपेठेपैकी एक असलेली मुरगूड हि समृद्ध बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या खेड्यांचा दैनंदिन व्यवहार या शहराशी आहे. एक मध्यवर्ती व्यापारी केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या बसस्थानक आवारात भव्य असे बहुमजली व्यापारी संकुल उभे राहणे हि काळाची गरज आहे. यामध्ये व्यापाऱ्यांच्या सोयी बरोबरच एसटी महामंडळाला चांगला महसूल देखील मिळेल, हि योजना यशस्वी झाल्यास हा पथदर्शक प्रकल्प म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबविणे शक्‍य होईल यासाठी एसटीला मुरगूड नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करील.यावेळी दत्ता मंडलिक,समीर मसवेकर आदी उपस्थित होते.

 

Web Title: murgud news kolhapur news kolhapur news