मुरगूडची जनताच माझ्यासाठी लाल दिवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मुरगूड - कागल व मुरगूड या दोन शहरांतील सर्वसामान्य जनता बसलेल्या गाडीला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी त्या गाडीचा चालक होणार आहे, असे सांगून 28 तारखेनंतर म्हाडाचे पद स्वीकारणार. हा मुरगूडचाच सन्मान आहे. मुरगूडची जनताच माझ्यासाठी लाल दिवा आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले. या दोन ठिकाणच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यात विकासपर्व आणलेल्या नेत्यांच्या वारसांची आघाडी होईल, असेही त्यांनी संकेत दिले.

मुरगूड - कागल व मुरगूड या दोन शहरांतील सर्वसामान्य जनता बसलेल्या गाडीला प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी त्या गाडीचा चालक होणार आहे, असे सांगून 28 तारखेनंतर म्हाडाचे पद स्वीकारणार. हा मुरगूडचाच सन्मान आहे. मुरगूडची जनताच माझ्यासाठी लाल दिवा आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले. या दोन ठिकाणच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यात विकासपर्व आणलेल्या नेत्यांच्या वारसांची आघाडी होईल, असेही त्यांनी संकेत दिले.

येथील दत्ता देशमुख सभागृहात भाजप व शाहू आघाडीतर्फे समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल विलास गुरव व भाजपचे (भटक्‍या विमुक्‍त) तालुकाध्यक्ष म्हाळू हजारे यांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी घाटगे बोलत होते. अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रवीणसिंहराजे घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, दत्तामामा खराडे आदी प्रमुख उपस्थित होते.

श्री. घाटगे म्हणाले, ""विचारपूर्वक निर्णय घेऊनच भाजपमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत आम्ही कोणाला तरी पाठिंबा द्यायचा, त्यांना निवडून आणायचे यासाठीच गटाचा वापर केला. पण राजेसाहेबांच्या इच्छेसाठी यापुढील सर्व निवडणुकांत आमच्या गटाचा उमेदवार असेल. कोणाला विरोध म्हणून आम्ही निवडणुका लढवत नाही. आमचा कोणी विरोधक नाही. आमची स्पर्धा आहे ती फक्‍त काळाशी. यापुढे काळानुसारच वाटचाल करू. कागल व मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्यावर कोणी कितीही टीका केली तरी घराण्याच्या संस्कारानुसार प्रचाराची चांगली प्रतिमा ठेवू.''
खराडे म्हणाले, ""मुरगूडला मोठे करण्याचे काम घाटगे घराण्याने केले. त्याचा इतिहास लिहायचा झाल्यास प्रत्येक पानावर घाटगेंचे नाव लिहावे लागेल. राजेंनी बोलून दाखलेली शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी यापुढील प्रत्येक निवडणुकीत घाटगे गटाचा उमेदवार असेल.''

म्हाळू हजारे, संजय भारमल, सौ. शहनाज मगदूम यांची भाषणे झाली. अनंत फर्नांडिस यांनी स्वागत केले. सुनीलराज सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. बाजार समिती उपाध्यक्षा आशालता पाटील, रामभाऊ खराडे, विलास गुरव, मनोहर आवटी, निवृत्ती रावण, यलगोंडा नुल्ले, छोटू चौगले, सत्यजित पाटील, भगवान गुरव आदी उपस्थित होते.

कोणाला पाडण्यासाठी नाही...
शाहू आघाडीने नेहमी प्रत्येकाला पाठिंबाच दिला. हे किती दिवस चालायचे? असा सवाल करून श्री. घाटगे म्हणाले, ""शाहू आघाडी वाढवली पाहिजे, तिला रणांगणात उतरवले पाहिजे. त्यासाठी सक्रिय भूमिकेतून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठे योगदान आहे. आता निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणार आहोत.'' कागल व मुरगूड नगरपालिकेत ऐतिहासिक काम करणाऱ्या वारसांची (दोन घाटगे व मंडलिक असे नाव न घेता) आघाडी होईल, असे सांगितले. हा निर्णय कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Murgud peoples is important for me