नागाचे कुमठे... मल्लांना पाठबळ देणारे गाव

धनाजी फडतरे
धनाजी फडतरे

वडूज - नागाचे कुमठे (ता. खटाव) या गावाने सुमारे ६० ते ७० वर्षांपासून कुस्तीची परंपरा जोपासली आहे. कुस्ती प्रशिक्षणासाठी परगावी असलेल्या युवकांना दररोज एसटीने घरची दूध-भाकरी पुरवत गावकऱ्यांनी कुस्तीची पाठराखण, तर गावातील अनेक दानशूरांनी या  मल्लांना कुस्तीसाठी पाठबळ दिले आहे. त्यामुळेच गावाने महाराष्ट्र  केसरीची ढाल पटकावली आहे. 

औंध संस्थानने कुस्तीला राजाश्रय दिला होता, त्यामुळेच दिनकर मांडवे हे या संस्थानचे पैलवान म्हणून प्रसिध्द होते. संस्थानची ही परंपरा संस्थानच्या प्रमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनीही पुढे सुरू ठेवली आहे. त्यामुळेच औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेतील ऐतिहासिक कुस्ती मैदानासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील मल्लांसह कुस्ती शौकिनांची मोठी उपस्थिती असते. गावातील रघुनाथ मांडवे, शिवाजीराव फडतरे, हरिबा मांडवे, दिनकर मांडवे, संभाजीराव फडतरे, भिकू मांडवे, वामन मांडवे, सयाजी मांडवे, तानाजी मांडवे, संभाजी कोळी या नामवंत मल्लांनी कुस्ती क्षेत्रात गावचा नावलौकिक वाढविला. १९९० च्या काळात गावची कुस्ती परंपरा अधिक गतीने वाढली. गावातील अनेक युवक कुस्ती प्रशिक्षणासाठी सातारा तालीम संघात दाखल होऊ लागले. मुळातच नागाचे कुमठे हे कायम दुष्काळाचा सामना करणारे गाव आणि त्यातही बहुतांशी युवकांची घरची स्थिती बेताची होती. त्यामुळे या युवकांना गावातून घरच्या दूध, तुपाचा खुराक दररोज एसटीने पाठविला जात होता. येथील पंचायत समितीचे माजी सदस्य धर्माशेठ मांडवे यांचे वडील (कै.) दामूशेठ मांडवे, शंकरशेठ देवकर, नारायणशेठ देवकर, (कै.) गोविंदशेठ मांडवे यांनी युवकांना पाठबळ देत गावच्या यात्रेत चांगल्या इनामाच्या कुस्त्या लावून 
या परंपरेला प्रेरणा दिली. त्यांची ही परंपरा त्यांचे पुत्र संजय मांडवे जोपासत आहेत. १९९७ मध्ये संदीप मांडवे-साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठातून कुस्तीमध्ये राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. तर, २००० मध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत धनाजी फडतरे यांनी महाराष्ट्र केसरी पदावर, तर तानाजी मांडवे यांनी महाराष्ट्र केसरी वजनी गटात देदीप्यमान यश मिळवून गावचा नावलौकिक सर्वदूर पोचवला. सध्या गावातील अमोल फडतरे, पांटुरंग मांडवे, मंगेश फडतरे, अमोल धोत्रे, निखिल मांडवे, शुभम मांडवे, गणेश मांडवे, वामन बोडरे हे युवक कोल्हापूर, खवसपूर, सातारा, सांगली आदी तालीम संघांतून कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन राज्यस्तरावर गावचा नावलौकिक वाढवीत आहेत. गावात दरवर्षी होणाऱ्या कुंभेश्वर देवाच्या वार्षिक यात्रेत चांगल्या इनामांच्या, निकाली व नेत्रदीपक कुस्त्या पाहणे ही कुस्ती शौकिनांसाठी मोठी पर्वणीच असते. त्यामुळेच राज्य, राष्ट्रीय स्तरावरील अनेक मल्लांनी या कुस्ती मैदानाला भेटी दिल्या आहेत. गावाने कुस्तीबरोबरच राजकीय पटलावरही आपले नाव कोरले आहे. येथील धर्माशेठ मांडवे यांनी पंचायत समितीचे सदस्यपद, संदीप मांडवे-साळुंखे यांनी सभापतिपद भूषविले.

नागाचे कुमठे गावातील ग्रामस्थांनी गेली अनेक दशके कुस्तीची परंपरा जोपासली आहे. औंध संस्थानने कुस्तीला दिलेल्या राजाश्रयामुळे खरे तर ही परंपरा अधिक वाढली. घरच्या बिकट परिस्थितीतही युवकांना कुस्तीसाठी प्रेरणा देण्याचे काम गावातील ग्रामस्थ तसेच दानशूरांनी केले आहे.
- संदीप मांडवे-साळुंखे, माजी सभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com