विखे यांच्याकडून 208 कुटुंबे दत्तक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नगर - 'सत्ताधारी व विरोधकांनीही राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन शेतकरी आत्महत्येच्या प्रश्‍नावर मार्ग काढावा. त्यासाठी विखे परिवाराने 208 कुटुंबांना आज दत्तक घेतले. राज्यातील अन्य नेत्यांनीही दायित्व म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घ्यावे,'' असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केले.

"लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सहाय्य योजना' आजपासून सुरू करण्यात आली. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात विखे बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक शांतिलाल मुथा अध्यक्षस्थानी होते. विखे पाटील म्हणाले, 'दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारातून ही संकल्पना सुचली. त्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.

शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही आणि आत्महत्या करणारच नाही, याबाबत विचार करण्याची गरज आहे. त्याच्या आत्महत्येचे राजकीय भांडवल होऊ नये. सामाजिक भूमिकेतून त्याकडे पाहावे. सरकारने संघर्ष यात्रेची टिंगल केली. दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांच्या पोकळ गप्पा मारल्या. त्यात शेतकरी भरडला गेला. कोणत्याच सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मार्ग निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे प्रायश्‍चित्त म्हणून हा प्रयत्न आहे.''

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, धनश्री विखे पाटील आदी उपस्थित होते. या वेळी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अपघात विम्याचे धनादेश, पांगरमल दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीचे धनादेश व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 208 कुटुंबांना पिठाची गिरणी, शिवणयंत्र आदी साहित्य देण्यात आले.

Web Title: nagar news 208 family adopt by radhakrishna vikhe patil