भंडारदरा ८०% भरले; मुळा पाणलोट क्षेत्र भिजून चिंब..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

परिसरातील शेती जलमय झाली असून भात रोपे पाण्यात बुडाली आहेत. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. घाटघर येथे मोठ्या प्रमाणात धुके असून धुक्यात वाट काढण्यासाठी पर्यटक आपल्या गाड्यांचे दिवे लावून प्रवास करताना दिसत आहेत

नगर  - भंडारदरा पाणलोटक्षेत्रातील रतनवाडी येथे १२ इंच पाऊस पडून अतिवृष्टी झाली असून सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा पाणलोट क्षेत्रात मोठी जलवृद्धी झाली आहे. भंडारदरा जलाशयात तीव्र गतीने पाण्याची आवक होत असून आज (शनिवार) सकाळी धरणात ८७५८ दशलक्ष घनफूट साठा होता. सकाळपासूनच पावसाने अधिक जोर धरल्याने सायंकाळपर्यँत धरण भरण्याच्या अंतिम टप्प्यात जाईल.

परिसरातील शेती जलमय झाली असून भात रोपे पाण्यात बुडाली आहेत. ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. घाटघर येथे मोठ्या प्रमाणात धुके असून धुक्यात वाट काढण्यासाठी पर्यटक आपल्या गाड्यांचे दिवे लावून प्रवास करताना दिसत आहेत. "जिल्ह्याची चेरापुंजी' असलेल्या या भागात पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने जनावरे व माणसे गारठली आहेत . 

भंडारदरा जलाशयात ८३६ दशलक्ष घनफूट, मुळामध्ये ७५९ दशलक्ष व निळवंडेत ६२३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. हरिशचंद्रगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीतून १५ हजार क्युसेक्सने, प्रवरा मधून ५ हजार क्युसेक्सने व गोदावरी मधून ३०९४५ क्युसेक्सने पाणी वाहत आहे. त्यामुळे मुळा व प्रवरा परिसराच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: nagar news: bhandardara dam