'भीष्म', 'अर्जुन', "रुद्र'च्या शक्तीची प्रचिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नगर - धडधडत धावणारे रणगाडे...डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत "शत्रू'च्या बंकरवर जाऊन आदळणारे क्षेपणास्त्र...शक्तिशाली बॉंबचा बेछूट मारा...मशिनगनमधून होणाऱ्या गोळीबाराचा आवाज, "शत्रू'वर तुटून पडलेले जवान आणि मिशन पूर्ण होताच अभिमानाने फडकावलेला तिरंगा...अशा चित्तथरारक युद्धप्रसंगाची अनुभूती आज नागरिकांनी के. के. रेंजमध्ये घेतली.

नगर - धडधडत धावणारे रणगाडे...डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत "शत्रू'च्या बंकरवर जाऊन आदळणारे क्षेपणास्त्र...शक्तिशाली बॉंबचा बेछूट मारा...मशिनगनमधून होणाऱ्या गोळीबाराचा आवाज, "शत्रू'वर तुटून पडलेले जवान आणि मिशन पूर्ण होताच अभिमानाने फडकावलेला तिरंगा...अशा चित्तथरारक युद्धप्रसंगाची अनुभूती आज नागरिकांनी के. के. रेंजमध्ये घेतली.

लष्कराची युद्ध-प्रात्यक्षिके पाहताना आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रूचा मुकाबला करण्यासाठी लष्कर कसे सज्ज आहे, याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रह्मण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) व मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे आयोजित हा युद्धसराव झाला. हा सराव पाहण्यासाठी निमंत्रित नगरकरांसह इजिप्त, ब्राझील, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, नायजेरिया, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रिटन, अमेरिका आदी देशांतील सैन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सरावाचे मुख्य आकर्षण ठरला भीष्म (टी-90) रणगाडा. या रणगाड्याद्वारे सोडलेल्या क्षेपणास्त्राने डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत शत्रूचे बंकर नष्ट केले. आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलच्या जवानांनी अर्जुन (टी-55), अजेय (टी-72) व भीष्म (टी -90) या रणगाड्यांचे आणि मॅकेनाइज्ड इन्फंट्रीच्या जवानांनी सारथ (बीएमपी) रणगाड्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. त्या दरम्यान मानवरहित टेहळणी विमानाचे प्रात्यक्षिक व रुद्र या हेलिकॉप्टरने चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची वाहवा मिळविली. या वेळी लष्कराकडे असलेले अत्याधुनिक युद्ध-साहित्य आणि रणगाड्यांची माहिती देण्यात आली.

प्रत्यक्ष रणगाड्यातून तोफगोळे व बेछूट गोळीबार करत दूरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला. प्रात्यक्षिकांच्या तिसऱ्या टप्प्यात आकाशात घिरट्या घालणाऱ्या रुद्र हेलिकॉप्टरने जमिनीवरील लक्ष्यावर मारा केला. त्यानंतर कमांडरच्या सूचनांनुसार तोफगोळे डागणारे रणगाडे, जवानांचा गोळीबार, शत्रूच्या चौकीवर तुटून पडलेले पायदळाचे जवान, असे युद्धाचे चित्रच के. के. रेंजमध्ये पाहायला मिळाले.

आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल व मॅकेनाइज्ड इन्फंट्रीच्या जवानांनी आपली युद्धक्षमता दाखविली. युद्धकौशल्यात सुधारणा करण्याचे काम त्यातून केले जाते. 1916पासून रणगाड्यांच्या रचनेत सतत बदल होत आहेत. भविष्यातील युद्धपद्धतीनुसार रणगाडे व युद्धनीतीत बदल करण्यात येत आहेत. भारतीय सैन्य योग्य दिशेने बदल स्वीकारत आहे.
- ब्रिगेडिअर विक्रांत नायर, प्रमुख अधिकारी, टेक्‍निकल ट्रेनिंग, आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल, नगर

Web Title: nagar news bhishma, arjun rudra power