श्रीगोंद्यात डेंगीचा बळी; दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

संजय आ. काटे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

ऋषभ याची डेंगीचा स्थानिक रुग्णालयात नमुना तपासला नव्हता. पुण्यात त्याचे निदान झाले का याची निश्चित माहिती नाही. सध्या तरी तो डेंगी सदृश्य आजाराने मरण पावल्याची माहिती आहे. शहरात इतर काही रुग्ण डेंगी पाॅझीटिव्ह आले आहेत. 
डाॅ. संघर्ष राजूळे, वैद्यकिय अधिकारी ग्रामिण रुग्णालय श्रीगोंदे. 

श्रीगोंदे (नगर) : पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या शहरातील ऋषभ प्रसाद देसाई या चिमुकल्याचा डेंगीने बळी घेतला. त्याच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात अगोदर उपचार झाले मात्र तो पुण्यात उपचार घेत असताना शनिवारी रात्री मरण पावला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला डेंगी झाल्याचे स्पष्ट  सांगितले मात्र प्रशासनावर ही बाब शेकणार असल्याने डेंगी अजून निष्पण्ण झाला नसून तो डेंगीसदृश्य आजाराने गेल्याचे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार ऋषभ याला त्रास होवू लागल्याने काही दिवसांपुर्वी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला काहीच फरक न पडल्याने त्याच्या  पालकांनी त्याला गुरुवारी रात्री पुण्याला केईएम रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्याला डेंगी असल्याचे तेथील डाॅक्टरांच्या लक्षात आले. मात्र निदान उशिरा झाल्याने ऋषभला जीव गमवावा लागल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. 

ऋषभ हा शहरातील महादजी शिंदे विद्यालयात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत होता. त्याच्या वडीलांचा शहरात सराफी पेढी असून दोन वर्षांपुर्वी त्यांच्या पेढीवर दरोडा पडला होता. त्याचा तपास अजूनही लागलेला नाही. देसाई कुटूंबावर ऋषभच्या जाण्याचे मोठे संकट कोसळले आहे. तो डेंगीच्या साथीने गेल्याचे समजताच शहरात मोठी संतापाची लाट होती. अजून अनेक रुग्ण या साथीने ग्रासलेले असून प्रसासनाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

ऋषभ याची डेंगीचा स्थानिक रुग्णालयात नमुना तपासला नव्हता. पुण्यात त्याचे निदान झाले का याची निश्चित माहिती नाही. सध्या तरी तो डेंगी सदृश्य आजाराने मरण पावल्याची माहिती आहे. शहरात इतर काही रुग्ण डेंगी पाॅझीटिव्ह आले आहेत. 
डाॅ. संघर्ष राजूळे, वैद्यकिय अधिकारी ग्रामिण रुग्णालय श्रीगोंदे. 

शहरात डेंगीविषयी जनजागृती पालीका करीतच आहे. ज्या भागात ही अडचण आहे तेथे जास्त प्रमाणात आमचे लक्ष आहे. धूर फवारणी योग्य प्रकारे होत आहे. पालीका व आरोग्य विभाग संयुक्तरित्या यावर काम करीत आहे.  
धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी नगरपालीका.

शहरात डेंगीसह इतर साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. पालीका प्रशासनासह आरोग्य विभाग गांभिर्याने वागत नसल्याने हा बळी गेला. आता तरी यंत्रणनेने तत्काळ पावले उचलावित.
सतीश बोरा, अध्यक्ष व्यापारी संघटना श्रीगोंदे.

Web Title: Nagar news boy dead on Dengue