संगमनेर तालुक्यात बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

हरिभाऊ दिघे
बुधवार, 26 जुलै 2017

या घटनेने परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार व वास्तव्य अधोरेखित झाले आहे. बिबटे अधिक संख्येने असल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे

तळेगाव दिघे ( जि. नगर ) - संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात अंदाजे अडीच वर्षे वयाचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. आज (बुधवार) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी हलविला.

वडगावपान शिवारात अशोक बाळू थोरात या शेतकऱ्याची डाळींबबाग आहे. सकाळी त्यांना बागेजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. याबाबत त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वनपाल शिवाजी डांगे, वनरक्षक एस. एम. पारधी, वनमजूर ढेरंगे, थोरात यांनी घटनास्थळी येत पंचनामा करीत बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निंबाळे ( ता. संगमनेर ) येथील रोपवाटिकेत हलविला. मृत मादी बिबट्या अंदाजे दोन वर्ष वयाचा असून त्याच्या नाकातून रक्तस्राव झाल्याचे वनपाल शिवाजी डांगे यांनी सांगितले. डॉक्टरांच्या उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर बिबट्याच्या मृत्यूचे निश्चित कारण समजेल, असेही ते म्हणाले. वडगावपान शिवारात बिबट्याचा मृतदेह बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार व वास्तव्य अधोरेखित झाले आहे. बिबटे अधिक संख्येने असल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

पिंजरे लावण्याची गरज 
वडगावपान, कोल्हेवाडी, समनापूर व पोखरी हवेली गावांच्या शिवारात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. शेळ्या व माणसांवर बिबटे हल्ले करतात. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावावेत, अशी मागणी युवक कार्यकर्ते निलेश थोरात यांनी केली आहे. 

Web Title: nagar news: dead leopard in sangamner