पंधरा दिवसांसाठी छिंदम जिल्ह्यातून हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नगर - शिवजयंतीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जिल्हा पोलिस प्रशासनाने नगर जिल्ह्यामधून पुढील पंधरा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. सोमवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी छिंदमला याबाबतची नोटीस बजावली. 

""छिंदम याच्याबद्दल लोकांच्या मनात राग कायम असून, असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. तो राज्यात राहिल्यास त्याच्या जिवाला धोका आहे. कायदा व सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ शकते,'' असे हद्दपारीच्या नोटिशीत म्हटले आहे. छिंदमबाबत अजूनही संताप कायम आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला नगर जिल्ह्यामधून पंधरा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात याआधी सात गुन्हे आहेत. 

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने छिंदम याला नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने छिंदम याला नगर जिल्ह्यामधून पंधरा दिवसांसाठी हद्दपार करण्याची नोटीस काढली. छिंदम याला राज्यातून कायमचे हद्दपार करावे, यासाठी शिवप्रेमी संघटनेकडून उद्या (ता. 2) नगर शहरात मोर्चा काढण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून नियोजन बैठकाही झाल्या आहेत.

Web Title: nagar news deputy mayor of nagar municipal corporation of bjp shripad chhindam