नगर - खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन राजू आगे या तरुणाच्या हत्याकांडातील सर्व आरोपींची आज जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
सचिन हौसराव गोलेकर, नीलेश महादेव गोलेकर, शेषराव हौसराव गोलेकर, राजकुमार शेषराव गोलेकर, विनोद अभिमन्यू गटकळ, सिद्धेश्वर विलास गोलेकर, भूजंग सूर्यभान गोलेकर, संदीप तुकाराम शिकारे, विलास हरिभाऊ ढगे (सर्व रा. खर्डा ता. जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यात तीन अल्पवयीन होते. जामिनावर सुटका झालेल्या साईनाथ रावसाहेब येवले याचे निधन झालेले आहे.
खर्डा येथील कान्होबा डोंगर परिसरात 28 एप्रिल 2014 रोजी नितीन आगे या तरुणाचा झाडाला लटकलेला संयशास्पद मृतदेह आढळला होता. याबाबत राजू आगे यांच्या फिर्यादीवरून खून व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींनी नितीन आगे यास शाळेतून मारहाण करत वीटभट्टीवर नेले. तेथून लिंबोणीच्या बागेत नेऊन मारहाण केली. त्यानंतर कान्होबाच्या डोंगराकडे नेऊन गळफास दिला, असे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करून मुख्य तीन आरोपींसह दहा जणांना अटक केली. त्यातील तीन अल्पवयीन आरोपी होते.
आरोपींनी मृत नितीन आगे याला मारहाण करून गळाफास देऊन जिवे मारल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाने केला; पण त्याचा गळा कोणी आवळाला हे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
|