श्रीगोंदा: गोरक्षकांवर पोलिस ठाण्यातच संतप्त जमावाचा जबरी हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

हल्ल्याची शंका आल्याने त्यातील चार-पाच जणांनी बाजूच्या दुकानात धाव घेतली. जमावाने दगडफेक करीत गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार पोलिस ठाण्याच्या आवारातच सुरू होता. मारहाण होत असताना काही पोलिस बघ्यांच्या गर्दीत उभे होते; कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी मात्र कोणीच पुढे गेले नाही

नगर - नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा येथील पोलिस स्थानकामध्ये सुमारे 50 जणांच्या जमावाने घुसून गोरक्षकांवर हल्ला घडविल्याची घटना घडली आहे. या गोरक्षकांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडून दिला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे. हा टेम्पो कसाईखान्याकडे चालला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्थानकामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी टेम्पोचा मालक वाहिद शेख व चालक राजु फत्रुभाई शेख यांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 24) व त्यांच्या 11 सहाय्यकांनी हा टेम्पो पकडून दिला होता. या भागातील जनावरांचे प्रसिद्ध व्यापारी केंद्र असलेल्या काष्टी गावावाकडे केल्या जाणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीकडे स्वामी व त्यांचे सहाय्यक लक्ष ठेवून होते. स्वामी हा महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारत कृषी गोसेवा संघ संघटनेचा सदस्य आहे. याचबरोबर स्वामी समस्त हिंदु आघाडीच्या "गोरक्षा प्रमुख' संस्थेशीही संबंधित आहे. आपली नेमणूक "मानद प्राणीहित (ऍनिमल वेलफेअर) अधिकारी' म्हणून करण्यात आली असल्याचा दावाही स्वामी याच्याकडून करण्यात आला आहे.

""गायींची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. यानुसार आम्ही याची माहिती श्रीगोंदा येथील पोलिस पथकास कळविली. दौंड अहमदनगर रस्त्यावरील एका हॉटेलजवळ हा टेम्पो अडविण्यात आला. यामधून दोन गायी व 10 बैल वाचविण्यात आले. यानंतर आम्ही या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलिस स्थानकामध्ये गेलो. ही तक्रार दाखल करत असतानाच सुमारे 50 जणांचा शस्त्रसज्ज जमाव आमच्यावर हल्ला करण्यासाठी एकत्र आला होता. आम्ही पोलिस ठाण्यामधून बाहेर पडताच आमच्यावर हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोरांनी आम्हाला लुटत आमच्याजवळील सोनेही हिसकावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली,'' असे स्वामी याने सांगितले.

पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हे कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या बाहेर आले. त्या वेळी शहरातील तरुणांनी त्यांना वेढा घातला. हल्ल्याची शंका आल्याने त्यातील चार-पाच जणांनी बाजूच्या दुकानात धाव घेतली. जमावाने दगडफेक करीत गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. 

हा सर्व प्रकार पोलिस ठाण्याच्या आवारातच सुरू होता. मारहाण होत असताना काही पोलिस बघ्यांच्या गर्दीत उभे होते; कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी मात्र कोणीच पुढे गेले नाही. या प्रकारात सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Web Title: nagar news: mob attacks gau rakshaks in Ahmednagar