'पार्सल स्फोटा'चा तपास नाशिक एटीएसकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नगर - नगरमध्ये कुरिअर कंपनीच्या कार्यालयामध्ये एका पार्सलच्या झालेल्या स्फोटाचा तपास नाशिक एटीएसकडे (दहशतवाद विरोधी पथक) देण्यात आला आहे. बॉंबस्फोट झालेल्या मारुती कुरिअर कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण नगर सायबरसेलच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नगर शहरातील माळीवाडा भागात असलेल्या मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयामध्ये मंगळवारी (ता. 20) रात्री हा स्फोट झाला. हा स्फोट क्रूड बॉंबचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कुरिअर कार्यालयात पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले आहे. पुण्यातील सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावे हे पार्सल लिहिले होते. त्यामुळे हे दहशतवाद्यांचे कृत्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. राज्याचे पोलिस महासंचालक आणि अप्पर पोलिस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक यांच्या आदेशाने स्फोटाचा तपास नाशिक एटीएसकडे देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक युनिटच्या एटीएसचे अधिकारी आज दिवसभर नगरमध्ये होते. सरकारी विश्रामगृहावर गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची बैठकही झाल्याचे समजते. गुन्ह्याची पद्धत आणि टार्गेट केलेल्या व्यक्तीचा विचार करता या स्फोटासाठी दहशतवादी संघटनांचा यात हात आहे का? या अंगानेही तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: nagar news parcel blast inquiry nashik ats