नगर - गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील सुमारे साडेचारशे मुले पोलिस होणार आहेत. पोलिसभरतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबी या तरुणांनी पूर्ण केल्या आहेत. या तरुणांना जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे एक महिन्याचे भरतीपूर्व प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींसाठी आदिवासी विकास प्रकल्पाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी दिली.
शर्मा म्हणाले, 'पोलिसांच्या पाल्यासह पारधी समाजातील तरुणांना नोकरी मिळावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पुढाकारातून रविवारी (ता.26) सकाळी नऊ वाजता न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावर नोकरी मेळावा होत आहे. त्यासाठी नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतील सुमारे दोन हजारांवर तरुणांनी नोंदणी केली आहे. ऐनवेळी आलेल्यांचीही नोंदणी केली जाणार आहे.''
आतापर्यंत जिल्ह्यातून साडेसातशे तरुणांनी, नाशिक जिल्ह्यातून 900 तरुणांची यादी आली आहे. मेळाव्यात 50हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होतील. दिव्यांगांसाठी नोकऱ्या देणाऱ्या कंपन्याही त्यात सहभागी होतील. ग्रामीण भागातील तरुणांची रोजगाराची गरज पाहून पुण्यातील "जॉब शोकेस' कंपनीतर्फे तरुणांना नोंदणी कार्ड दिले जाणार आहे. वर्षभरात रोजगाराची संधी असलेली माहिती त्या माध्यमातून दिली जाणार आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
|