श्रीगोंद्यात गौण खनिजाच्या कारवाईचे 15 कोटी कागदावर

संजय आ. काटे 
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ वसूली न झाल्यास दिला थेट निलंबनाचा इशारा 
 

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंद्यात गौण खनिजाची पंधरा कोटींची दंडात्मक रक्कम केवळ कागदावर राहिली असून ती रक्कम वसूलच झालेली नाही. यातील काही प्रकरणे जरी न्यायालायात असली तरी उर्वरित दंडात्मक रक्कम वसुलीसाठी अल्टीमेटम असून, वसुली झाली नाही, तर आता चौकशी नव्हे तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिला. 

जिल्हाधिकारी महाजन यांनी बुधवारी श्रीगोंदे तहसील कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला. ते रात्री उशिरापर्यंत विशेष करून गौण खनिजबाबतच्या कारवाईच्या फाईली तपासत होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, येथील गौण खनिजाच्या दंडात्मक कारवाईची पंधरा कोटींवर रक्कम वसूलच झालेली नाही. 121 पैकी केवळ सव्वीस लाखाचे 21 दंडात्मक कारवाईचा वसूल झाला असून उर्वरित रक्कम कागदावर आहे. यातील शासनाकडे अपिल असणारी चार प्रकरणे असून 21 कारवाया न्यायालयात दाखल आहेत अथवा त्यांना स्थगिती आहे. 

पंधरा कोटीची रक्कम थकीत दिसत असल्याने ती वसूल करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाजन यांनी ठराविक वेळ दिली आहे. दहा लाख ते एक कोटीपर्यंत दंड असणाऱ्या व्यक्तीची वसूली तहसीलदार महेंद्र माळी-महाजन यांनी करायची असून त्यावरची रक्कम प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांना सोपवली आहे. तर दहा लाखाच्या खालची रक्कम मंडलाधिकारी व तलाठ्यांनी करण्याचे आदेश महाजन यांनी दिले आहेत. जी प्रकरणे न्यायालयात आहे त्याची सध्यस्थिती काय आहे, कुठल्या प्रकरणातील संबधीत व्यक्तीविरोधातील वाॅरंट प्रलंबित आहेत का याची माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. 

तर अशा चोरांवर गुन्हे दाखल करा... : महाजन
67 प्रकरणात संबधीत गौण खनिज चोरांच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासन लावण्यात आले आहे.ज्या गौण खनिज चोरांनी दंडात्मक रक्कम भरली नाही म्हणून त्यांच्या सातबारा उताऱ्यांवर सरकार लागले मात्र तरीही त्याच व्यक्ती त्या क्षेत्रात पिके घेत आहे अशा लोकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची सक्त आदेश महाजन यांनी दिल्याचे समजले.

Web Title: nagar news shrigonda action against mining