श्रीरामपूरच्या तीन अट्टल गुन्हेगारांना पकडले

सूर्यकांत नेटके
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोघांवर यापूर्वी "मोक्का'नुसार कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोघांवर यापूर्वी "मोक्का'नुसार कारवाई

नगरः श्रीरामपूर येथील बेग टोळीतील तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (शुक्रवार) पकडले. अरणगाव येथे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजता ही कारवाई केली. तिघांकडून एका वाहनासह गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस व वेगवेगळ्या कंपन्यांचे तेरा मोबाईल असा आठ लाख 37 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभाग असलेले हे आरोपी फरार होते. सागर अशोक बेग ऊर्फ चन्या, त्याचा भाऊ आकाश अशोक बेग ऊर्फ टिप्या व सागर साहेबराव शिंदे (तिघे रा. श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेले पाच जण पळून गेल्याचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

बेग बंधू "मोक्का'तील आरोपी आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते अनेक दिवसांपासून फरार होते. शर्मा म्हणाले, "गंभीर गुन्हे करणाऱ्या बेग टोळीची श्रीरामपूर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दहशत आहे. या टोळीतील लोक दौंडवरून नगरकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहायक निरीक्षक संदीप पाटील व शरद गोर्डे, उपनिरीक्षक सुधीर पाटील व श्रीधर गुट्टे, अण्णा पवार, रवी कर्डिले, राजकुमार हिंगोले, भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, दत्ता जपे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, विशाल दळवी, दत्ता गव्हाणे, सचिन अडबल, उमेश खेडकर, योगेश सातपुते, सोन्याबापू नाणेकर यांनी अरणगाव (ता. नगर) येथे सापळा लावला. संशयित गाडी पोलिसांनी गतिरोधकांजवळ अडवली. गाडीतील चन्या, टिप्या व सागर यांना ताब्यात घेतले. ते पाहताच त्यांच्या मागून येणारी दुसरी गाडी चालकाने मागे वळवली आणि त्यातील अन्य आरोपी दौंडच्या दिशेने पळून गेले.''

तिघांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन खुशाल दाभाडे, लखन प्रकाश माखिजा, सागर काशिनाथ शेटे, रितेश आसाराम काटे आणि सुधीर काळोखे अशी पळून गेलेल्यांची नावे असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. चन्याविरुद्ध नाशिक रोड, श्रीरामपूर तालुका व लोणी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक, शिर्डी, कोपरगावला प्रत्येकी तीन, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तीन असे तेरा गुन्हे आहेत. टिप्याविरुद्ध औरंगाबाद, संगमनेर, श्रीरामपूर असे वेगवेगळे बारा गुन्हे असल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे. पळून गेलेलेही या टोळीतील आहेत का, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, याचा पोलिस तपास करत आहेत. त्यांना लवकर पकडू, असे शर्मा म्हणाले.

गाडीवर पोलिसांचा 'लोगो'
बेग बंधूंकडून पकडलेल्या आलिशान मोटारीवर 'पोलिस' असा "लोगो' लावलेला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ती गाडी दुसऱ्याच्या नावावर आहे. त्याचा पोलिस तपास करत आहेत. गाडी चालवणाऱ्या टिप्याकडे मिळालेल्या परवान्यावर त्याचा फोटो असला, तरी नाव दुसऱ्याचेच आहे. मुंबईतही या आरोपींविरुद्ध काही गुन्हे दाखल असून, तेथेही "मोक्का' लागलेला आहे. त्याची माहिती घेतली जात आहे, असे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

Web Title: nagar news srirampur police arrested three unarmed criminals