नगरमध्ये उपमहापौरांच्या घर, कार्यालयांत तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

नगर - प्रभागातील कामासंदर्भात आज सकाळी भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यास दमबाजी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने शिवप्रेमी जनतेच्या भावना भडकल्या. संतापलेल्या शिवप्रेमींनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपमहापौर छिंदम यांच्या कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलने केली. त्यात त्यांचे महापालिकेतील कार्यालय, दिल्लीगेट येथील खासगी कार्यालय, घर, तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली.

छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी "काम बंद' आंदोलन पुकारले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकण्यात आले होते. दरम्यान, घटनेबद्दल दुपारनंतर उपमहापौर छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे खासदार तथा पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी जाहीर केले. छिंदम यांनीही "व्हिडिओ क्‍लिप'द्वारे माफीनामा सादर करत जनतेची माफी मागितली. पोलिसांनी उशिरा छिंदम यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला.

छिंदम यांनी शिवरायांबाबत अपशब्द वापरल्याची क्‍लिप सकाळी साडेअकरापासून जास्त प्रमाणात व्हायरल झाली. यानंतर शिवप्रेमी व सर्वपक्षीय पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे नियोजन केले. दिल्लीगेट परिसर आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरला. शिवराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम दिल्लीगेट येथील छिंदम यांचे कार्यालय, घर व वाहनांचा समाचार घेतला. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी शिवराळ भाषेत छिंदम यांच्या नावाने शिवीगाळ करीत त्यांचे दिल्ली गेट येथील कार्यालय, घराच्या काचा फोडल्या, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

घरासमोरील वाहनांचीही तोडफोड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली. पोलिस पथक घटनास्थळी पोचल्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड झाली.

त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा निषेध मोर्चा दिल्लीगेटला पोचला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या मालकीचे हॉटेल मिर्चीवर हल्ला चढविला. त्यात खुर्च्या, आतील फर्निचर व कुंड्याही तोडल्या.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार संग्राम जगताप, कॉंग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी छिंदम यांच्या राजीनाम्याची व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात आले, तसेच छिंदम यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.

Web Title: nagar news western maharashtra bjp leader use bad words shivaji maharaj