हातकणंगलेस नगरपंचायतीचा दर्जा

हातकणंगलेस नगरपंचायतीचा दर्जा

हातकणंगले - हातकणंगले तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, यासाठी कृती समितीच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर आज यश आले. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याची घोषणा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. दरम्यान गावात साखर, पेढे वाटत कार्यकर्त्यांनी गुलाल, फटाक्‍यांची आतषबाजी केली.

तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायतीचा निर्णय शासनाच्या वतीने २०१४ मध्ये जाहीर केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी नगरपंचायती स्थापन झाल्या, मात्र हातकणंगले वंचित होते. गेली दोन वर्षे कृती समितीचा लढा सुरू होता. नागरिकांनीही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालत गावबंद, मूक मोर्चा, उपोषण या माध्यमातून पाठपुरावा केला होता. 

काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानंतर नगरविकास विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार केला. मंत्रिमंडळ उपसमितीच्या चार सदस्यांच्या सह्या झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मुख्यमंत्र्यांच्या अंतरिम मंजुरीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घोषणा केली.

नगरपंचायत दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, हिंदुराव शेळके, अरुण इंगवले आदीचे सहकार्य लाभल्याचे कृती समितीचे निमंत्रक  अतुल मंडपे, मुधुकर परीट, पंडित निंबाळकर यांनी नमूद केले. भगवान पवार, आणासो चौगुले, विजय निंबाळकर, अरुण जानवेकर, अनिल पाटील, विजय चौगुले, विजय खोत, स्वप्नील पुजारी, अमर इंगवले, विद्याधर निगवे, प्रताप शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

हातकणंगलेवासीयांचा न्यायासाठी लढा सुरू होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, राजीव आवळे यांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट शक्‍य झाली. भाजप सरकारने हातकणंगलेला न्याय दिल्याची भावना ग्रामस्थांत आहे.
- अरुण इंगवले, 

गटनेते, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com