सोलापूर महापालिकेच्या नामकरणाची मागणी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 19 जून 2019

स्मारक आणि ग्रंथालय 
महापालिकेच्या अथर्व गार्डनमध्ये महात्मा बसवेश्‍वर यांचे स्मारक उभारण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात पाच कोटींची, तर उर्दू घर येथे मौलाना अबुल कलाम आझाद ग्रंथालयासाठी तीन कोटींची तरतूद करण्याचा प्रस्तावही या दोन्ही नगरसेवकांनी दिला आहे. 

सोलापूर : पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचे नाव महापालिकेस द्यावे, असा प्रस्ताव एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी आणि गाझी जहागिरदार यांनी दिला आहे. त्यावर 27 जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत चर्चा अपेक्षित आहे. 

महापालिका परिवहन विभागाचे छत्रपती शहाजी महाराज असे नामकरण करण्याचा ठराव काही दिवसांपूर्वी परिवहन समितीच्या सभेत मंजूर झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. खरादी व श्री. जहागिरदार यांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला असताना या दोन्ही नगरसेवकांनी नोव्हेंबर 2017 मध्ये सोलापूरचे नाव बदलून मोची समाजाचे कुलगुरू "जांबमुनी महाराज' किंवा सोलापूरचे "सुफीसंत शाहजहूर' असे करावे असा प्रस्ताव दिला होता. कांग्रेसच्या वैष्णवी करगुळे यांनी जांबमुनी महाराजांचा प्रस्ताव दिला होता. मात्र नंतर तो दफ्तरी दाखल करण्यात आला. 

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटले होते. होळकर यांचे नाव मिळाल्याने धनगर समाजाने दिवाळी साजरी केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा केला होता. त्याच धर्तीवर आता परिवहन विभागाला छत्रपती शहाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव झाल्याने, महापालिकेचे नामकरण श्री मार्कंडेय महामुनी सोलापूर महापालिका असे करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 

स्मारक आणि ग्रंथालय 
महापालिकेच्या अथर्व गार्डनमध्ये महात्मा बसवेश्‍वर यांचे स्मारक उभारण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात पाच कोटींची, तर उर्दू घर येथे मौलाना अबुल कलाम आझाद ग्रंथालयासाठी तीन कोटींची तरतूद करण्याचा प्रस्तावही या दोन्ही नगरसेवकांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: name change of Solapur Municipal corporation