बाजार समितीला "दादा पाटलां'चे नाव 

Name of Dada Patil to Market Committee
Name of Dada Patil to Market Committee

नगर तालुका : तालुक्‍याच्या उभारणीत स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तालुक्‍यात माझ्यासह असंख्य कार्यकर्ते दादा पाटलांनी घडवले. अनेक सहकारी संस्था घडविल्या, वाढवल्या आणि सक्षमपणे उभ्या केल्या. त्यांचे कार्य नव्या पिढीच्या स्मरणात राहावे, यासाठी स्व. दादा पाटील शेळके यांचे नाव नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात येईल, अशी घोषणा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. 

माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नुकतेच निधन झाले. त्या पार्श्‍वभूमीवर नगर तालुक्‍यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते. या वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आरपीआय, तालुक्‍यातील विविध शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले, की पाटील यांना कुठलाही राजकीय वारसा नसतानासुद्धा राजकारणात चांगला संघर्ष केला. राजकीय जीवनात इतर पक्षांशी समन्वय राखणारा नेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी खर्च केले. 

बाजार समितीचे सभापती विलास शिंदे म्हणाले, की पाटील आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रगती होत गेली. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. दादा पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्यात व केंद्रात प्रस्ताव पाठवू. 

कॉंग्रेसचे संपत म्हस्के म्हणाले, की पाटलांनी नगर जिल्ह्यात पाझर तलाव, शिक्षण संस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. विम्याचा त्यांचा मोठा अभ्यास होता. दरवर्षी शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी ते अग्रभागी राहत. 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऍड. उद्धव दुसुंगे म्हणाले, की शिक्षण संस्था काढताना कधीच स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही अथवा राजकारणही केले नाही. त्यांनी शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. मी त्यांच्याच नेतृत्वाखाली घडलो. 

बाबासाहेब गुंजाळ म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविताना त्यांनी स्वतःच्या तब्येतीची कधीच काळजी केली नाही. आमदार असतानासुद्धा ते सायकलवर फिरत होते. 

या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, किसनराव लोटके, दादा दरेकर, रेवणनाथ चोभे, बाबासाहेब खर्से, संतोष म्हस्के, सूर्यभान पोटे, विष्णूपंत खांदवे, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, अनिल करांडे, संदीप कर्डिले, किसनराव लोटके, रवींद्र कडूस उपस्थित होते. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com