मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान - डॉ. हमीद दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान आहे. हे आव्हान सीबीआय निश्‍चितपणे पूर्ण करेल,  अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. 

सातारा - डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांचे मारेकरी कोण याचा उलगडा झाला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचे आव्हान आहे. हे आव्हान सीबीआय निश्‍चितपणे पूर्ण करेल,  अशी अपेक्षा डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला उद्या (ता. 20) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. 20 ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता; परंतु या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आली, तरी नेमके खुनी कोण हे निष्पन्न होत नव्हते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. दाभोलकर कुटुंबीय आणि अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाभोलकरांच्या खुन्यांना शोधून कडक शिक्षा करावी, यासाठी आंदोलने, रॅली काढून लोकशाही मार्गाने आवाज उठविला होता. दाभोलकर कुटुंबीयांनी पंतप्रधानांपर्यंत जाऊन तपासाबाबत आपले म्हणणे मांडले होते. साताऱ्यात तर दर वर्षी 19, 20 ऑगस्ट रोजी डॉ. दाभोलकरांना अभिवादन करून "अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकर कुटुंबीय जिल्हा प्रशासनाला तपासाबाबत साकडे घालत होते. या घटनेला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एक दिवस आधी का होईना मारेकऱ्यांना शोधण्यात तपासी यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे या सर्व घटनेच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण हेही आता लवकरच उघड होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी संवाद साधला. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ""तपासात प्रगती होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने सीबीआयच्या मागे तपासात सुधारणा घडवून आणण्याबाबत सूचना केली होती. वेळोवेळी कडक शब्दात सीबीआयवर ताशेरे ही ओढले होते. "अंनिस'चे कार्यकर्ते आणि दाभोलकर कुटुंबीयांनीही तपासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासोबतच समाजातील अनेकांनी शांततेच्या आणि विधायक आंदोलने केली होती. यामुळे यंत्रणेवर नैतिक दबाव वाढत होता; पण वेळ येत नव्हती. ही वेळ नालासोपाराच्या घटनेमुळे आली. यातील संशयितांच्या चौकशीतून याचे धागेदोरे हाती लागले. यातूनच तपासी यंत्रणेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी कोण याचा उलगडा करता आला आहे. आता सीबीआयपुढे त्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे व मुख्य सूत्रधार शोधण्याचे आव्हान आहे. हे आव्हान सीबीआय निश्‍चितपणे पूर्ण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Narendra Dabholkar murder case Hope real perpetrators nabbed soon says Hamid Dabholkar