नृसिंहवाडीत आणखी पंधरा दिवस येऊ नका; प्रशासनाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

गल्लीबोळांत दलदल, विस्कटलेली दुकाने आणि पडलेली घरे असे विदारक चित्र श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन येथे स्वच्छता मोहीम राबवीत आहे; तरीही गावगाडा सावरण्यास अद्याप पंधरा दिवस लागतील त्यामुळे भाविकांसह पर्यटकांनी दर्शनास येण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

इचलकरंजी : गल्लीबोळांत दलदल, विस्कटलेली दुकाने आणि पडलेली घरे असे विदारक चित्र श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन येथे स्वच्छता मोहीम राबवीत आहे; तरीही गावगाडा सावरण्यास अद्याप पंधरा दिवस लागतील त्यामुळे भाविकांसह पर्यटकांनी दर्शनास येण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

दरम्यान, कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावरील या गावाला यंदा पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराच्या पाण्याने 2005 पेक्षा अधिक पातळी गाठल्याने नुकसानीचा अंदाज नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आला नाही; त्यामुळे अनेकांनी घरदार सोडून स्थलांतर केले. तब्बल दहा ते बारा दिवस गाव पाण्याखाली राहिले, पूर ओसरताच आता स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सध्या गावातील रस्त्यांवर दलदल निर्माण झाली असून, दुकानांतील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीच्या टप्प्यात रस्ते साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम जोरदारपणे सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येथील साफसफाईवर लक्ष ठेवून आहेत. पुरामुळे दत्त मंदिरातील देव मंदिराबाहेर आणण्यात आले असून, मंदिर परिसरात अद्यापही पाणी आणि प्रचंड दलदल आहे, सध्या मूर्ती पुजाऱ्यांच्या घरातच ठेवण्यात आली असून, तेथेच पूजा, आरती सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narsinhwadi Datta Mandir open after 15 days in Kolhapur District