नाशिकच्या चौघींची पॅरास्विमिंगमध्ये 8 सुवर्णपदकांसह 11 पदकांची कमाई

राजेंद्र बच्छाव
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

या पथकात नाशिकच्या सिद्धी भांडारकर आणि सिया पाटील यांनी सबज्युनिअर गटात, गौरी गर्जे ज्युनिअर गटात तर सायली पोहरे हिनेे महिलांच्या गटात राज्याचे प्रतिनिधित्व केले.

नाशिक (इंदिरानगर) : उदयपूर राजस्थान येथे आज संपन्न झालेल्या 17 व्या पॅरास्विमिंग राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या चार मुलींनी महाराष्ट्राकडून खेळताना 8 सुवर्णपदकांसह 11 पदकांची कमाई केली. रविवार ता. 5 पासून या स्पर्धा सुरू होत्या. ‍१८ राज्यातील ३३४ जलतरणपटूंनी यात भाग घेतला होता.

महाराष्ट्राचा ३३ खेळाडूंचे पथक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या पथकात नाशिकच्या सिद्धी भांडारकर आणि सिया पाटील यांनी सबज्युनिअर गटात, गौरी गर्जे ज्युनिअर गटात तर सायली पोहरे हिनेे महिलांच्या गटात राज्याचे प्रतिनिधित्व केले. सिद्धि ने 50 आणि 100 मीटर फ्री स्टाईल आणि शंभर मीटर बॅक स्ट्रोक या प्रकारात सुवर्णपदके मिळविली. सिया ने ५० मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर बॅक स्ट्रोक आणि 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदके मिळविली.

गौरी गर्जे हीने 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक तर 100 मीटर फ्रीस्टाइल आणि 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात रजत पदके मिळवली. महिलांच्या गटात खेळणाऱ्या सायली पोहरे हिने 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्ण तर 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक मिळविले. शहरातील भोसला मिलिटरी स्कूल आणि वीर सावरकर तरण तलाव येथे या खेळाडू सराव करतात. घनश्याम कुंवर, अनिल सोनकांबळे आणि भूषण कुंवर हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. यंदाची प्रगती बघता पुढील वर्षी या चार ही खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करतील असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik news girls achieve para swimming medals