नाथाभाऊंचा प्रवेश अन्‌ जयंतरावांचे गाजलेले "कटाप्पाने बाहुबली को क्‍यो मारा'चे भाषण 

jayant rao-khadase
jayant rao-khadase

कामेरी (सांगली) ः राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यभर यात्रा केली होती. त्यावेळी जळगाव जिल्ह्यात गेल्यावर ही यात्रा मुद्दामहून मुक्ताईनगरच्या रस्त्याकडे वळाली आणि अर्थातच एकनाथ खडसे यांचा पाहुणचार घेतला गेला. त्या पाहुणचारात अजितदादा पवार, जयंत पाटील सहभागी झाले होते. त्याबाबत जयंत पाटील यांनी विधानसभेत एक भाषण केले होते आणि त्यावेळी एकनाथ खडसे यांना वगळून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्याने खदखद सुरु झाली होती. त्यावर जयंतराव म्हणाले होते, "कटाप्पाने बाहुबली को क्‍यो मारा' याचे उत्तर मागायला आम्ही मुक्ताईनगरला गेलो होतो. ते गाजलेले भाषण आता श्री. खडसे यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले असून समाज माध्यमातून ते गाजते आहे. 


एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना ते सतत बोलून दाखवत होते. पण, विरोधी बाकावर बसल्यानंतर खडसे यांच्या खदखदीला राष्ट्रवादीतून वाट करून देण्यात आली होती. त्याची पहिली सुरवात केली होती, दिवंगत आर. आर. पाटील यांनी. त्यांचे ते विधानसभेतील शेवटचे भाषण होते. त्यात आबा म्हणाले होते, तुम्हाला मुख्यमंत्री होता आले नाही, मात्र तुम्हाला कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पुजा करता आली, हा काय कमी मान दिला काय? खडसे यांच्या जखमेवरील खपली काढण्याचे काम आबांनी केले होते. आबा गेल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर आली आणि सांगलीच्या मातीतल्या या राजकीय पैलवानाने खडसे यांच्यावरील कथित अन्यायाच्या मुद्यावर चांगलेच रंगतदार भाषण केले. 


ते म्हणाले होते, की अजितदादा, राधाकृष्ण विखे-पाटील, मी असे आम्ही तिघे-चौघे जळगावला चाललो होतो. त्यावेळी नाथाभाऊ आमची रस्त्यात वाट पाहत बसले होते. सुखाने शांत आणि जीवन जगत होते तिथे. सत्तेच्या नादाला लागल्यावर माणसाचं सगळं बिघडत. एकदा सत्तेतून बाहेर माणूस आला की अत्यंत सुखी होतो समाधान होतो. नाथाभाऊ फारच समाधानी वाटत होते. अजितदादा, मी, विखे पाटील यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांनी दिलखुलासपणे त्याची उत्तरे दिली. पण, नाथाभाऊ या रस्त्यावर आमचे स्वागत करायला का थांबले? हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता.'' 

जयंतरावांना थांबवत नाथाभाऊंनी बाहुबली सिनेमाचा गाजलेला डायलॉग म्हटला. त्यावर जयंतराव म्हणाले, ""कटाप्पाने बाहुबली को क्‍यू मारा, यह जाननेके लिए हम आपके घर आये थे. महाराष्ट्राला या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी या राज्याचा बाहुबली बोलायला लागेल आणि त्यावेळी मोठा भूकंप होईल, हे त्यांनी मला सांगितले.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com