राष्ट्रीय महामार्ग आता उजळणार!

सातारा - महामार्गाच्या मध्यभागी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे.
सातारा - महामार्गाच्या मध्यभागी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे.

सातारा - सेवा रस्ता व महामार्ग पथदिव्याने उजळून निघणार आहे. सध्या महामार्गाच्या दुभाजकांमध्ये पथदिवे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज वितरण कंपनीकडून या दिव्यांसाठी वीज उपलब्ध केली जाणार असून, ज्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत, अशा ठिकाणी सेवा रस्त्यांच्या कडेने व महामार्गाच्या मध्ये असलेल्या दुभाजकांवर हे पथदिवे बसणार आहेत. या दिवाळीला महामार्ग पथदिव्यांनी उजळून निघणार आहे. 

सातारा- पुणे महामार्गाचे काम रिलायन्स कंपनीकडे होते. या निविदेत काम पूर्ण झाल्यावर महामार्गावर पथदिवे बसविण्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आता रिलायन्स कंपनीने महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी सेवा रस्ता पूर्ण आहे, अशा ठिकाणी पथदिवे बसविण्याचे काम सुरू केलेले आहे. सेवारस्ता असलेल्या ठिकाणी, तसेच प्रत्येक गावांच्या ठिकाणी महामार्गच्या मध्यभागी आणि सेवा रस्त्याच्या कडेने हे पथदिवे बसविले जाणार आहेत.

सध्या खिंडवाडी ते शेंद्रे या मार्गावर पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. या दिव्यांसाठी वीज वितरण कंपनीकडून कनेक्‍शन घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाच्या ठिकाणी आणि सेवा रस्ता असलेल्या ठिकाणी महामार्ग पथदिव्यांनी उजळून निघणार आहे. या पथदिव्यांसाठी लागणाऱ्या विजेचे बिलही रिलायन्स भरणार आहे. दिवाळीपर्यंत हे पथदिवे सुरू होतील, असे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे.

दिवाळीनंतर महामार्गातील बेकायदेशीर रस्ते बंद 
सेवा रस्त्यांच्या कडेने असलेल्या काही हॉटेल व्यावसायिकांनी महामार्गावरून सेवा रस्त्यावर वाहने हॉटेलमध्ये यावित यासाठी मातीचा भराव टाकून रस्ता केलेला आहे. यामुळे महामार्गावरील वाहनांना अडथळा होऊन अपघात होण्याची शक्‍यता आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने पोलिस अधीक्षकांकडे पत्र देऊन असे भराव टाकून केलेले रस्ते बंद करण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. दिवाळीनंतर असे तात्पुरते रस्ते तातडीने बंद केले जाणार असल्याचे महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com