'युद्धापेक्षा अपघातातील मृत्यूचे प्रमाण अधिक '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कोल्हापूर - "मी दुसऱ्याचा अपघात करणार नाही आणि माझाही होऊ देणार नाही', अशी शपथ प्रत्येकाने घेतली तर अपघाताचे प्रमाण नियंत्रित येईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी व्यक्त केला. 

देशात युद्धात जेवढे लोक मरत नाही तेवढे अपघातात मृत्यू पावतात. जिल्ह्यात अपघातातील समस्या गंभीर असून रोज चार ते पाच अपघातांत एकाचा हमखास मृत्यू होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर - "मी दुसऱ्याचा अपघात करणार नाही आणि माझाही होऊ देणार नाही', अशी शपथ प्रत्येकाने घेतली तर अपघाताचे प्रमाण नियंत्रित येईल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी व्यक्त केला. 

देशात युद्धात जेवढे लोक मरत नाही तेवढे अपघातात मृत्यू पावतात. जिल्ह्यात अपघातातील समस्या गंभीर असून रोज चार ते पाच अपघातांत एकाचा हमखास मृत्यू होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपात ते बोलत होते. जिल्हा पोलिस दल, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ही मोहीम राबविण्यात आली. या निमित्ताने उल्लेखनीय काम करणारे वाहतूक पोलिस, पोलिस कर्मचारी, विनाअपघात सेवा बजावणारे एसटीचे चालक यांचा सत्कार झाला. धैर्यप्रसाद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. टी. पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

तांबडे म्हणाले, वाहतुकीची शिस्त काय असते याचे धडे शालेय जीवनापासून मिळाले तर मनुष्य मोठा झाल्यावर पुन्हा ती चूक करणार नाही. शालेय अभ्यासक्रमात वाहतुकीच्या नियमांचा समावेश व्हावा, बहुतेक अपघात हे मानवी चुकांमुळे घडतात. समोरून येणारा आपली काहीही चूक नसताना ठोकरून जातो. जिल्ह्यात दररोज चार ते पाच अपघात होतात. त्यात एकाचा मृत्यू होतो आणि किमान तीन ते चार जण जखमी होतात. "मी दुसऱ्याचा अपघात होऊ देणार नाही आणि माझाही होऊ देणार नाही', अशी स्वयंशिस्त प्रत्येकाने पाळली तर वाहतूक पोलिस अथवा पोलिस कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. 

नंदकुमार काटकर यांनी गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत रस्त्यांची स्थिती चांगली असून मानवी चुकांमुळे जीवन धोक्‍यात येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. रोहिणी पाटील, भूषण देशपांडे यांनी वाहतूक नियमासंबंधी नेमकेपणाने मनोगत व्यक्त केले. 

पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, श्री. वर्मा यांच्यासह पोलिस निरीक्षक उपस्थित होते. एस. आर. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी आभार मानले. 

80 टक्के अपघातांना चालक जबाबदार असतात. अस्थिर बुद्धी, नियंत्रणाचा अभाव आणि अहंकार ही प्रमुख कारणे त्यामागे आहेत. मी दुसऱ्याला ओव्हरटेक करून दाखवतो हा अहंकार झाला आणि दुसऱ्याला पुढे जाऊ देणे ही शिस्त झाली. मद्यपान करून गाडी चालविणे, सुसाट वेग, मोबाइल सुरू ठेवन गाडी चालविणे अशी कारणे आहेत. भविष्यात अपघाताची संख्या कमी करायची असेल तर रहदारीचे नियम पाळल्याशिवाय पर्याय नाही. 
- व्ही. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: national road safety campaign