Navratri Festival 2019 : कोल्हापुरात नवदुर्गा दर्शन बस

अर्चना बनगे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नवरात्र उत्सवाच्या काळात महिलांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन खात्याने महिलांसाठी विशेष नवदुर्गा बसचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या काळात महिलांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन खात्याने महिलांसाठी विशेष नवदुर्गा बसचे आयोजन केले आहे. कोल्हापुरातील 14 दुर्गांचे दर्शन केएमटीच्या बसमधून होण्याची सोय यामध्ये आहे. 

नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीचे दर्शन घेण्याची महिलांची मोठी पसंती असते. यासाठी सर्वच महिलांना वाहनांनी जाणे शक्य नसते, अशा महिलांना नवदुर्गाचे दर्शन सहज आणि सुलभ व्हावे, त्याचबरोबर त्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने ही खास सोय केली आहे. या नवदुर्गा बसमध्ये केवळ नवदुर्गाचे दर्शन न होता तब्बल चौदा दुर्गांचे दर्शन महिलांसाठी ठेवण्यात आलेले आहे.

साधारण दीडशे रुपये आणि पाच तासाचा प्रवासचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान विशेष महिलांसाठी दक्षता घेण्यात आली आहे. सकाळी नऊ, दहा, अकरा, बारा, एक आणि दोन अशा वेळेमध्ये या बसची सुविधा देण्यात आलेल्या आहेत. शिवाय काही विशेष मंडळांना जर आवश्यक असेल तर त्यासाठी त्यांच्यासाठी देखील विशेष  सुविधा करण्यात आलेली आहे. या नवदुर्गा बसला तब्बल 17 वर्ष झालेत आणि या सतरा वर्षांच्या काळामध्ये अतिशय उदंड असा प्रतिसाद या बसेसला मिळत आहे.

महिलांना विशेष सुविधा मिळावी यासाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन खात्याने गेल्या सतरा वर्षांपासून नवदुर्गा बसचे नियोजन केले आहे महिलांना विशेष सुविधा मिळावी यासाठी वेळेचे नियोजन तसेच सुखरूप रित्या त्यांना दर्शन द्यावे असे नियोजन केले आहे
- सुनील जाधव, साहाय्यक वाहतूक निरीक्षक

या नवदुर्गा दर्शनमध्ये आम्हाला केवळ नवदुर्गा दर्शन नाहीतर  14 दुर्गांचे दर्शन मिळाल्याशिवाय या प्रवासामध्ये आणखीन आम्हाला मैत्रिणी मिळाल्या आणि दर्शनाबरोबर मैत्रीत दिवस घालण्याचा आनंद मिळाला.      - पूनम तासारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga bus for ladies in kolhapur for Navratri