समुपदेशनाद्वारे वाढविला आत्मविश्वास : लॉकडाउन काळात महिलांना मदतीचा हात

विनायक जाधव
Wednesday, 21 October 2020

सुरेखा पाटील; , गरीब कुटुंबांनाही साहित्याची मदत

बेळगाव : महिला कल्याण संस्थेच्या माध्यमातून गत ४३ वर्षांपासून महिलांसाठी कार्य करणाऱ्या सुरेखा पाटील इतरांसाठी आदर्श ठरल्या आहेत. संस्थेतील सर्वांच्या सहकार्यानेच आपण सर्वांपर्यंत पोहचू शकतो, सर्वांना मदत करू शकतो, असे स्पष्ट मत मांडत सहकाऱ्यांची मूठ आवळणाऱ्या सुरेखा अनेक गरीब महिलांसाठी समुपदेशनाचे काम करतात. महिलांमध्ये जनजागृती करण्यासह संस्थेच्या सहकार्याने शहर व खेडोपाडी पोहचून गरीब आणि निराधार कुटुंबांना कोरोना काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.

बेळगावात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लॉकडाउनची स्थिती झाली. अशाकाळात सर्वाधिक परिणाम महिलांच्या मानसिकतेवर झाला. अनेक महिलांना आपल्या कुटुंबाची काळजी लागून राहिली होती. अशावेळेस बानूली या स्थानिक रेडिओ केंद्रावरुन महिलांमध्ये जागृतीचे कार्य करण्यात आले. महिलांमध्ये कोरोनाचा काळात कसे धीट राहावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वेबिनारचे आयोजन केल्यानंतर त्यात ८२ जणांनी सहभाग घेतला. यासह शहरात आणि खेडेगावात फिरुन प्लास्टिक कचरा गोळा करून त्यावरच संसाराचा गाडा चालविणाऱ्या महिलांना मदतीचा हात दिला. बेळगावातील २१० कुटुंबांना प्रत्येकी ५ ते ६ हजार रुपयांचे धान्यवाटप करण्यात आले. यासाठी त्यांना प्लास्टिक फॉर चेंज इंडिया संस्थेची मदत मिळाली.

हेही वाचा- मुरमाच्या मातीत मेहनत आली फळाला ; चार गुठ्यांत फुलवला झेंडू -

लॉकडाउनमध्ये शेतमजुरांचीही उपासमार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सिबुलाला फौंडेशनच्या माध्यमातून शेतमजूर कुटुंबांना अन्नधान्यासह जीवनावश्‍यक साहित्य पुरविले. महिलांसाठी सॅनिटरी पॅडसह सर्व आवश्‍यक वस्तूंचा यात समावेश होता. नागनूर स्वामी मठातर्फे चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात तसेच उज्ज्वला महिला पुनर्वसन केंद्रालाही कोरोनाकाळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मदतीची अपेक्षा ठेवून नव्याने येणाऱ्या महिलांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. यातही श्रीमती सुरेखा यांचे योगदान राहिले. 

 

महिला कल्याण संस्थेच्या माध्यमातून मागील ४३ वर्षांपासून महिलांच्या समस्यांसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या सहकार्यामुळेच आपण हे सर्व काम केले. त्यामुळेच संस्थेने आतापर्यंत ३ राष्ट्रीय पुरस्कारांसह ७ राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. कोरोनाच्या काळात काम करतेवेळी अनेक अनुभव आले. त्यातून एकमेकांना नेहमी सहकार्य करत राहावे, अशी भावना झाली आहे.
-सुरेखा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga special story by vinayak jadhav belgaum