Navratri Special : कोरोना काळात ‘त्या’ बनल्या संकटमोचक

सतीश जाधव
Sunday, 18 October 2020

सुषमा पाटील यांचे कार्य; समुपदेशन, उपचार, आर्थिक मदतीचेही वितरण

बेळगाव : कोरोना काळात लॉकडाउनमध्ये अनेक बेघरांना विविध संस्था, संघटनांकडून मदत देण्यात आली. अशा संस्था, संघटना सोशल मीडिया, वृत्तपत्राच्या माध्यमातून काम प्रकाशझोतात आल्या. त्यांचा अनेकांनी गौरवही केला. मात्र, प्रसिद्धीपासून दूर राहून महापूर तसेच कोरोनाकाळात अनेक बेघरांचा आधार बनलेल्या आरपीडी क्रॉसवरील सुश्रृषा प्राणिक हिलींग सेंटरच्या प्रमुख सुषमा पाटील व सहकाऱ्यांनी अनेकांना मदतीचा आधार दिला आहे. कोरोनाकाळात समुपदेशन करण्यापासून उपचार, आर्थिक मदत व खाण्यापिण्याचे साहित्यही त्यांनी दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्था संघटनांकडूनही त्यांचा गौरव झाला आहे.

शहरात कोरोनामुळे २४ मार्चपासून लॉकडाउन झाले. या काळात राज्य पातळीवर कार्यरत योग विद्या प्राणिक हिलींग सेंटर, बेळगावातील फूड फॉर ॲग्री व सुश्रृषा प्राणिक हिलींग सेंटरच्या माध्यमातून सुषमा पाटील व सदस्यांनी काम केले आहे. पाटील कुटुंबीयांकडून राज्य सरकारलाही मोठे आर्थिक सहकार्य केले आहे. बेळगाव तालुक्‍यासह खानापूर तालुक्‍यातील दुर्गम भागात गरजूंना अन्नधान्य, सॅनिटरी नॅपकीन, बेघरांना ब्लॅंकेट्‌स, महिलांना साड्या, कपडे, रस्त्याच्या बाजूला झोपलेल्यांना चहा, बिस्कीट, कचरा गोळा करणाऱ्या महिलांना २० दिवस पुरेल इतका अन्नसाठा, औषधोपचार आदी साहित्य देऊन मदत केली. 

हेही वाचा- Navdurga Special : व्यंगावर मात करत तिने घेतला आरोग्य सेवेचा वसा ,मंडणगडातील नवदुर्गाची कहाणी -

अग्निशामक दल, पोलिस ठाण्यालाही मास्कसह सॅनिटायझरचे वितरण केले आहे. गतवर्षी ऑगस्टमधील महापुरावेळी फाऊंडेशनर्फे अनेकांना मदतीचा हात दिला. चार वर्षांपूर्वी सेंटरतर्फे राज्य पातळीवर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशानाचा कार्यक्रम झाला. यामध्ये सुमारे १ लाख जणांनी, केवळ बेळगावमधून विविध शाळा व महाविद्यालयांच्या सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यानंतरही त्यांनी समुपदेशानाचे काम सुरूच ठेवले. त्यांना स्मिता मांगले, शिल्पा वडवडगी, विद्युत, नीलिमा अजगावकर, मयुरा मिर्जी, भारती गुगी, रेखा भंडारी, श्‍वेता पाटील, इंदिरा जोशी, शिल्पा होसमनी आणि सुमा यांची मदत मिळत आहे. 
 

महापूर व कोरोनाकाळात ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत केली आहे. अनेकांना मास्क, सॅनिटायझर व आर्थिक सहकार्यही केले आहे. यानंतरही आमचे मदत कार्य सुरु राहील. सुश्रृशा प्राणिक हिलिंग सेंटरच्या माध्यमातून समुपदेशानाचे कार्यही सुरु आहे.
-सुषमा पाटील, प्रमुख, सुश्रृषा प्राणिक हिलिंग सेंटर

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri festival special story by satish jadhav belgaum