पालिकेच्या सभेत आज नविआ- भाजप सदस्यांची एकजूट दिसणार ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने सत्ताधाऱ्यांच्या व प्रशासनाच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका सभागृहात नगरविकास आघाडी आणि भाजपच्या नगरसेवकांची एकजूट महत्त्वाची ठरणार आहे. 

सातारा ः गणेशोत्सव व दुर्गा देवी विसर्जनासाठीचा सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च, लोकसभा निवडणुकीसाठीचा दोन लाख 75 हजारांचा प्रशासकीय खर्च आदी दर मंजुरीचे सुमारे 100 विषय उद्या (बुधवारी) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने सत्ताधाऱ्यांच्या व प्रशासनाच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका सभागृहात नगरविकास आघाडी आणि भाजपच्या नगरसेवकांची एकजूट महत्त्वाची ठरणार आहे. 
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे 144 विषय मंजुरीसाठी आहेत. बहुतांश विषय हे दर मंजुरीचे आहेत. 
लोकसभा निवडणूक 2019 मधील मतदान केंद्रावर मतदान केंद्र क्रमांक लिहून घेण्यासाठी 25 हजार रुपये, तसेच मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांच्या जेवणासाठी आलेल्या दोन लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास मंजुरीचा विषय सभागृहापुढे आला आहे. 
त्या व्यतिरिक्‍त सन 2018-19 पालिकेच्या शाळा क्रमांक 23 (गोडोली) येथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, शाळा क्रमांक आठ आणि 20 मधील शाळेतील मुलांना बसण्यासाठी लाकडी बेंच पुरविणे, पालिका शाळांमध्ये डिजिटल साहित्य पुरविणे, कास धरण परिसर तसेच बंगला परिसरमध्ये देखभाल व संरक्षण करण्यासाठी दोन खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, शाहू कलामंदिर परिसरात खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी तीन लाख 51 हजार 230 रुपये, कॉंक्रिट करणे व पेव्हर बसविण्यासाठी तीन लाख 48 हजार 728 रुपये, नाट्यगृहामधील एअर कंडिशन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 77 हजार 880 रुपये, शौचालयाच्या दक्षिण बाजूकडील कुंपण भिंत बांधण्यासाठी तीन लाखांपर्यंतचा खर्च, तसेच नवीन ध्वनियंत्रणा बसविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पालिका कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सद्यःस्थितीत असणाऱ्या 12 कॅमेऱ्यांची वार्षिक देखभाल करण्यासाठी एजन्सी नेमणे, पालिकेत आधार कार्डवर आधारित बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा राबविण्यासाठी एक लाख 38 हजार रुपयांची 14 बायोमेट्रिक टॅब यंत्रणा खरेदी करणे आदी विषय मंजुरीसाठी आहेत. या व्यतिरिक्त बहुतांश विषय हे पाणीपुरवठा विभागाचे आहेत. 
गेल्या महिन्यांत अनावळे गावानजीक जमीन खचून कास माध्यमातून येणारी जलवाहिनी निसटली होती. त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले होते. त्यास सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च आला, तसेच केसरकर पेठेतील घोरपडे टाकी येथे खासगी मजूर नेमण्यासाठी दोन लाख 99 हजार 442 रुपयांच्या खर्चास वार्षिक दराने मंजुरी देणे, तसेच विविध ठिकाणी जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे आदी विषयांच्या खर्चास सभागृह मंजुरी देण्याचा निर्णय घेईल. 

गणेशोत्सव व दुर्गादेवी विसर्जनावरील खर्च 
मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही ः दोन लाख 39 हजार रुपये. 
विसर्जनासाठी क्रेन व साहित्य ः चार लाख 19 हजार रुपये. 
प्लॅस्टिक लायनर कागद बसविणे ः चार लाख 41 हजार रुपये. 
विसर्जन मार्गावर वीज व ध्वनी यंत्रणा : दोन लाख 77 हजार रुपये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawia-BJP members will be united in the council meeting today?