मूर्ती ठेंगणी; मात्र शिकण्याची ऊर्मी उत्तुंग

नयना जोकार
नयना जोकार

माढा - मानेगाव (ता. माढा) येथील नयना नागनाथ जोकार (वय १५) ही ठेंगणी आहे. शरीराने ती विकलांग असली, तरी बुद्धीने मात्र तल्लख आहे. त्यामुळे तिने अपंगत्वावर मात करीत शिक्षण सुरू ठेवले आहे. 

नयनाची उंची सध्या अडीच फुटांपेक्षा कमी आहे, तर वजन आठ ते १० किलोच्या आसपास आहे. तिची आई शेतमजूर, तर वडील गवंडी कामगार आहेत. सध्या ती मानेगावच्या संजीवनी विद्यालयात पाचवीत शिक्षण घेत आहे. अंकगणिते, कविता, महापुरुषांची भाषणे न अडखळता ती म्हणून दाखवते. तिच्या बोलण्याने सर्वच प्रेरित होतात. त्यामुळे मानेगाव परिसरात तिला ‘नयनाताई’ या नावाने हाक मारतात.

तिच्या घरी वीज नसल्याने नयनाने तिच्या वडिलांसोबत माढा महावितरण कार्यालयात येऊन वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज केला. तिची करुण कहाणी ऐकून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजजोडणीच्या खर्चाचा भार उचलला आहे. नयनाला तिच्या भवितव्याबद्दल विचारले असता, तिने हृदय पिळवटून टाकणारे उत्तर दिले. ती म्हणाली, ‘‘आई-वडील हेच माझ्यासाठी सर्वस्व असून, आई-वडिलांच्या पश्‍चात माझा सांभाळ कोण करणार, असा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे माझे भवितव्य अंधकारमय आहे. त्यामुळे मी स्वप्न बघून तरी काय करू,’’ असे मार्मिक उत्तर तिने दिले.

मी रोजंदारीवर असून सध्या अत्यंत हलाखीच्या स्थितीत जगत आहे. नयनासाठी सरकारकडून महिन्याला ६०० रुपये मिळतात, तेदेखील तीन ते चार महिन्यांपासून मिळाले नाहीत. 
- नागन्नाथ जोकार, नयनाचे वडील, मानेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com