न केलेल्या कामाचा इस्लामपूर नगराध्यक्षांकडून डांगोरा; विरोधकांचा आरोप

न केलेल्या कामाचा इस्लामपूर नगराध्यक्षांकडून डांगोरा; विरोधकांचा आरोप

इस्लामपूर - नगराध्यक्षांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन डांगोरा पिटु नये, लोकांची कामे करावीत, असे म्हणत ज्या पाच कोटी रुपयांच्या विकासकामांचे टेंडर त्यांनी काढले आहे, ती कामे सुरू करावीत, केल्यास मी स्वतः तुमच्या घरात पाणी भरायला येतो, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक शहाजी पाटील यांनी आज येथे दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सभेत श्री. पाटील बोलत होते. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, सभापती विश्वनाथ डांगे, प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, नगरसेवक खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, जयश्री पाटील उपस्थित होते.

शहाजी पाटील म्हणाले, "जयंत पाटील यांचा विकासकामाला सहकार्य करण्याचा आदेश पाळून आम्ही सत्ताधाऱ्यांना सहकार्य केले. तरीही लोकांच्या हिताची कामे सत्ताधाऱ्यांकडून केली जात नाहीत. शहरात प्रचंड रोगराई पसरली आहे. सदस्यांना विश्वासात न घेता नगराध्यक्ष काम करत आहेत. सत्ताधारी नगरसेवकच सभात्याग करताहेत. स्वतःची स्तुती, प्रसिद्धी करून घेण्यासाठी निधी आलेला नसतानाही टेंडर काढण्याचे पाप नगराध्यक्षांनी केले आहे. निनाईनगरचे आम्ही केलेलं काम ते स्वतःच्या नावावर खपवत आहेत. त्यांनी ते गार्डनही पाहिलेले नाही. असल्यास त्यांनी जाहीर एका व्यासपीठावर यावे, आम्ही चर्चेला तयार आहोत. दलित वस्ती निधी आणि साठेनगरात समाजमंदिर बांधल्याचे श्रेय घेतायत, त्यात त्यांचे योगदान शून्य टक्के आहे."

विजयभाऊ पाटील म्हणाले, "फुगीर आकडे ऐकवून लोकांची दिशाभूल सुरू आहे. आमच्या काळातील कामेच आज पुन्हा लोकांना त्यांनी केली असे दाखवले जात आज."

खंडेराव जाधव म्हणाले, "सत्ताधारी महाशय फेकू आहेत. राष्ट्रवादीच्या कामांचे श्रेय घेताहेत. जनतेचा एवढाच कळवळा असता तर लोकांचे प्रश्न सोडवले असते. भुयारी गटर योजनेचे काम आमच्यामुळे आले. इथं आलेली डेंग्यूची साथ राज्यात कुठेही नाही. घरटी रुग्ण आहेत. महाआरोग्य शिबिरात साडे बाराहजार रुग्ण आले होते. नगराध्यक्षांनी इस्लामपूर कुठे नेवून ठेवलंय? म्हणण्याची वेळ आलीय."

मुख्याधिकारी प्रज्ञा पवार - पोतदार म्हणाल्या, "उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा केला. पालिकेच्या खात्यावर १ कोटी ६७ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे."

रोझा किणीकर, शंकरराव चव्हाण, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, जयश्री माळी, गोपाळ नागे, मोहन भिंगार्डे यांची भाषणे झाली. माजी नगरसेवक सदानंद पाटील, संपत पाटील, मानसिंग पाटील, बशीर मुल्ला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com