'80 वर्षांचा म्हातारा काय करणार, असे काहीजण म्हणताहेत'

Sharad Pawar
Sharad Pawar

सातारा : अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानी बाणा दाखवत बलाढ्य अशा औरंगजेबाच्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. अटकेतून सुटून स्वराज्य निर्माण करत संपूर्ण देशाला शौर्याचा आदर्श घालून दिला. स्वाभिमानासाठी मुघलांच्या सत्तेला लाथाडणारे शिवराय कुठे आणि आज काय चाललंय, राजे हे वागणं बरं नव्हं, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका करत जिल्ह्यातील जनतेला सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी लढण्याचे आवाहन केले. विकासासाठी जातोय; असे म्हणत पक्ष सोडणाऱ्यांनी दहा-पंधरा वर्षे सत्तेत असताना काय केले, असा सवाल त्यांनी केला. 

पवारांच्या आजच्या दौऱ्यात तरुणाई व कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अनेक वर्षांनंतर अनुभवायला येत होता. रॅलीसह सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. एकूणच हा दौरा चैतन्यमयी झाला. जिल्ह्यातील सर्व भागातून पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजवर झालेल्या सर्व सभांपेक्षा कार्यकर्त्यांनी आज दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सभास्थळावरील संपूर्ण वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते. दोन्ही राजेंनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदा साताऱ्यात आले होते. त्यामुळे ते काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष होते. त्यानुसार त्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. 

पवार म्हणाले, "पुरंदरच्या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीला दिल्लीला जावे लागले. तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्‍वासन मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग याने दिले होते. राजे दिल्लीत गेले; परंतु पंचहजारी मनसबदाराच्या, ज्यांना राजेंनी धूळ चारली होती, त्यांच्या मागे त्यांना उभे करण्यात आले. लाचारीची मनस्वी चिड असणारे छत्रपती बलाढ्य अशा औरंगजेबाच्या दरबारातून तडक बाहेर पडले. त्यांना अटकही झाली. परंतु, ते डगमगले नाहीत. अटकेतून मोठ्या शिताफीने बाहेर पडले. राज्यात परतून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढा दिला. स्वराज्य निर्माण करून शौर्याचा इतिहास घडवला. आमिषांना न भुलता मुघल साम्राज्याला लाथाडणारे, संपूर्ण जगासमोर स्वाभिमान व शौर्याचा मानदंड उभे करणारे छत्रपती कुठे आणि आता काय चाललंय...' श्री. पवार हे बोलत असतानाच जनतेतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. घोषणाबाजी झाली. त्यानंतर पवार उदयनराजेंना उद्देशून म्हणाले "राजे, हे वागणं बरं नव्हं.' त्यानंतरही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, दीपक पवार, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, प्रभाकर घार्गे, बाळासाहेब भिलारे, अविनाश मोहिते, शशिकांत पिसाळ, सुरेंद्र गुदगे, कविता म्हेत्रे, राजेंद्र लावंघरे, बाळासाहेब सोळसकर, सुधीर धुमाळ, वैशाली शिंदे, जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गुलाल उधळायला बोलवाल? 
80 वर्षांचा म्हातारा काय करणार, असे काहीजण म्हणताहेत; पण मी सांगतो, काय पाहिजे ते करायची माझी तयारी आहे. 14 तास काम करायची गरज असेल तर, 20 तास काम करीन. परंतु, महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ देणार नाही. या जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या स्वाभिमान व शौर्याचा वारसा आहे. छत्रपतींचा काळ असो, की स्वातंत्र्यपूर्व काळ, प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची व संपूर्ण देशाला दिशा देण्याची ताकद या मातीत व इथल्या लोकांमध्ये आहे. तुम्ही साथ द्या. उद्याच्या 21 तारखेला मतदान आहे. घरोघरी फिरा, सर्वांना बरोबर घ्या, क्रांतिसिंह व यशवंतरावांच्या जिल्ह्यात लाचारीला थारा नाही, हे सर्वांना सांगा. विधानसभेच्या सर्व जागांसह लोकसभेमध्येही आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे काम करा, असे सांगत गुलाल उधळायला मला बोलवाल, अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली. त्यावेळी उपस्थित सर्वांनी हात उंचावून साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. 

हा जिल्हा चुकणाऱ्यांना जागा दाखवेल 
राज्याला दिशा देणारा हा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर अशा ब्रिटिशांशी संघर्ष करणाऱ्यांचा वारसा याला आहे. प्रत्येक युद्धात देशासाठी जीव देण्याची भूमिका घेणाऱ्या जवानांचा हा जिल्हा आहे. असा शौर्याचा, स्वाभिमानाचा बाणा असलेल्यांच्या वारसांकडून चुकीचा रस्ता घेतला जाणार नाही. कुणी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर त्याला त्याची जागा दाखविल्याशिवाय या जिल्ह्यातील जनता गप्प बसणार नाही, असा विश्‍वास श्री. पवार यांनी व्यक्‍त केला. 

तुम्हाला पगडी कोणी दिली? 
शरद पवार भाषणासाठी माईककडे आले, तेव्हा माईक शेजारी पगडी घालून तुतारीवाला उभा होता. समयसूचक वक्तव्यात वाक्‌बगार असलेल्या पवारांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही. माईकजवळ जाताच त्यांनी तुतारीवाल्याच्या पगडीला हात लावला. संपूर्ण सभेत एकच गलका उसळला. त्यामुळे भांबावलेला तुतारीवाला मटकन खाली बसला. पवारांनी त्याला हाताला धरून उठवले. त्यानंतर सभेला उद्देशून ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात कोण कोणाला पगडी घालत होते, हे मी टीव्हीवर पाहिले. तुम्हालाही कोणी पगडी घातलीय का, असे मी तुतारीवादकाला विचारत होतो, असे श्री. पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला. 

शिवबाच्या गादीसाठीच निर्णय 
पक्षशिस्त न पाळणाऱ्यांना पक्षात घेऊ नका असे सांगत होतो. परंतु, शरद पवारांनी तेव्हा ऐकले नाही, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केला. तो धागा पकडून श्री. पवार म्हणाले, "जयंतराव सांगत होते; परंतु मी वेगळी भूमिका घेतली. त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्याला कारणही तसेच आहे. मला छत्रपतींच्या गादीचा अभिमान आहे. महाराष्ट्र धर्म स्वीकारणाऱ्या, शिकवणाऱ्या माझ्या शिवबाची ही गादी आहे. त्या गादीकडे पाहूनच मी निर्णय घेतला. या राज्याला स्वाभिमानाचा वारसा आहे. आजचा तरुण पेटून उठलाय. त्याला लाचारीचा रस्ता पसंद नाही. लाचारी स्वीकारणाऱ्यांना तो नक्कीच धडा शिकवतील.'' 

शरद पवार म्हणाले... 
- पक्ष सोडणारे म्हणताहेत, विकासासाठी जातोय; मग दहा-पंधरा वर्षे सत्तेत असताना तुम्ही काय केले? 
- दुष्काळ व महापुरात तडफडणाऱ्यांकडे पाहायला राज्यकर्ते तयार नाहीत 
- शौर्यासाठी जिथे छत्रपतींच्या तलवारी तळपल्या त्या गडांवर हे छमछम वाजवायला निघालेत 
- नोकरीसाठी तरुण दारोदार फिरतोय, नोकरी नसल्याने त्यांची लग्नही रखडलीत 
- शेतकऱ्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचे पाप हे सरकार करतेय 
- देशासाठी नेहमीच रक्त सांडण्याची तयारी असलेला हा जिल्हा चुकलेल्यांना जागा दाखवेल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com