esakal | 'बाप बापचं असतो'; डिजिटल झळकले कोल्हापुरात
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Chief Sharad Pawar congratulation Digital in Kolhapur

सभेत पवार यांचे आगमन होताच "कोण आला रे, कोण आला, मोदी, शहांचा बाप आला' अशा दिल्या जाणाऱ्या घोषणांनी सभेचे ठिकाणी दुमदुमुन जात होते.

'बाप बापचं असतो'; डिजिटल झळकले कोल्हापुरात

sakal_logo
By
निवास चौगले

कोल्हापूर - विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पश्‍चिम महाराष्ट्रात मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर कोल्हापुरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उभा केलेल्या फलकावर लिहीलेला "बाप बापचं असतो' असा मजकूर चर्चेचा विषय ठरला आहे. 

पाच महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने दोन्ही काँग्रेसची अवस्था अवसान गळाल्यासारखी होती. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढणे आणि त्यात विजय होणे हे फार मोठे आव्हान दोन्ही काँग्रेससमोर होते. निवडणुका लागल्या आणि शरद पवार यांचा झंझावत महाराष्ट्रभर सुरू झाला.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील व भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यांची फौज मैदानात उतरली. पण या सर्वांना श्री. पवार पुरून उरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 

श्री. पवार यांनी महाराष्ट्रभर दौरा केला, ज्या जिल्ह्यात जातील तिथे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. श्री. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक सभांचा माहोल तर वेगळाच होता. सभेत पवार यांचे आगमन होताच "कोण आला रे, कोण आला, मोदी, शहांचा बाप आला' अशा दिल्या जाणाऱ्या घोषणांनी सभेचे ठिकाणी दुमदुमुन जात होते. विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राची पण संपूर्ण देशासह जगाचे लक्ष वेधून घेतले ते श्री. पवार यांनी, त्यातही सातारा येथे भर पावसात त्यांनी लाखो कार्यकर्त्यांसमोर केलेले भाषण तर "न भूतो न भविष्यते' असेच. परिणामी श्री. पवार हे तरूणाईंचे "आयडॉल' बनले. वयाच्या 80 व्या त्यांच्यातील हा उत्साह पाहून तरूण कार्यकर्तेही अचंबित झाले. 

विधानसभेच्या निकालात दोन्ही काँग्रेसला अपेक्षापेक्षा जास्त यश मिळाले. विधानसभेच्या तोंडावर दिग्गज नेते आमदार सोडून गेल्याने राष्ट्रवादी खिळखिळी झाल्याची टिका करणाऱ्यांचे तोंड बंद करतानाच पक्षाने तब्बल 56 जागा जिंकल्या. या विजयात श्री. पवार यांचा मोठा वाटा असल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने शहरात फलक उभे केले असून त्यावर लिहिलेला "बाप बापचं असतो' हा मजकूर चर्चेचा विषय ठरला आहे.