राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या वाटेवर

तुंग - राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या २३ जूनला कवठेपिरान (ता. मिरज) येथे नूतन खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार व गावातील विविध विकास कामांचे उद्‌घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संयुक्त कार्यक्रम होणार आहे. भाजपशी त्यांची वाढलेली जवळीक यातून अधोरेखित होते. 
२०१२ ते २०१७ या कालावधीत माने राष्ट्रवादीचे जिल्हापरिषद सदस्य होते. मात्र त्यावेळी त्यांची अध्यक्षपदाची संधी हुकली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देऊन अर्जही भरला, मात्र सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट साधण्यासाठी त्यांना माघारीचा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी सेनेने मराठा मोर्चातील केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करीत सेनेला जय महाराष्ट्र केले. गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी तटस्थ राहून स्वाभिमानी व काँग्रेसला मदत केली होती. 

लोकसभेपूर्वी त्यांची मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत ऊठबस वाढली होती. तर लोकसभा निवडणुकीत त्यांनी जय महाराष्ट्र केलेल्या शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार केला. आता ते भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जुळवाजुळवीत असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. २३ तारखेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची चाचपणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com