'सांगोल्यात शेकापने उपकाराची परतफेड म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा'

NCP
NCP

पंढरपूर : गेल्या 20 वर्षांपासून सांगोला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुखांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वयोमानुसार त्यांनीच आपण निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार गणपतराव देशमुखांनी येणाऱ्या निवडणूकीत आज पर्यंत केलेल्या उपकाराची परत फेड म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा. अशी आपण गणपराव देशमुखांकडे मागणी केली आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज सकाळशी बोलताना दिली.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक विद्यामान आमदार आणि नेते भाजप सेनेच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चे विषयी थेट त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही असल्याचे सांगत, सांगोल्यात शेकापने यावेळी राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साळुंखे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. सत्तेसाठी अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. सध्यातरी पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद सुरु आहे.

सांगोला विधानसभा मतदार संघावर आमदार गणपतराव देशमुखांचे आणि शेकापचे गेल्या 55 वर्षाहून अधिक काळ वर्चस्व आहे. 1995 च्या निवडणुकीतील पराभवाचा अपवाद वगळतात आमदार गणपतराव देशमुखांनी 1962 ते 2014 पर्यंत सांगोल्यातून  निवडून येणाच्या विक्रम केला आहे. सध्या त्यांचे वय जवळपास 93 वर्षे झाले आहे. वयोमानामुळे त्यांना फिरणे आणि काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  त्यामुळे येणार्या निवडणुकीत आमदार गणपतराव देशमुखांनी आज पर्यंत राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची आणि उपकाराची उताराई म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा  अशी आमची अपेक्षा असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले. गणपतराव देशमुख राष्ट्रवादीला पाठिंबा देणार की शेकापचा अन्य उमेदवार निवडणुकीला उभे करणार याकडेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com