साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; शिवेंद्रराजे भोसलेंचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

शिवेंद्रराजेंना आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हाती दिला. शिवेंद्रराजेंचा राजीनामा हा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठाधक्का आहे. सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजे २००४ च्या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आहेत. 

मुंबई : सातारा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या काही वर्षांपासून शिवेंद्रराजे व सातारचे खासदार उदयनराजे यांच्यातला वाद चिघळला होता. त्यातूनच शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. 

शिवेंद्रराजेंना आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हाती दिला. शिवेंद्रराजेंचा राजीनामा हा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठाधक्का आहे. सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजे २००४ च्या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आहेत. 

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले. राजघराण्यातील भाऊ, पण एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी. सातारा नगरपालिका निवडणुकीत या दोघांमध्ये वाद सुरु झाला. नगरपालिका निवडणुकीत आपले चुलत बंधू राष्ट्रवादीचेच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नीच्या विरोधात उदयनराजेंनी स्वतंत्र उमेदवार उभा केला. या निवडणुकीला राजा विरुद्ध प्रजा, असा रंग दिला गेला.  टोनाक्याचं व्यवस्थापन, दारुचं दुकान हटवण्याचा वाद अशा अनेक प्रसंगी उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्या वाद झाले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या दोन भावांमधील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी काही काळ दोघे एकत्र झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण दोघांच्याही मनातली आढी कायमच राहिली. 

सातारा जावली विधानसभा मतदारसंघाच्या भल्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सातारा, जावली तालुक्‍यातील त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजप प्रवेशाचा कौल घेतला. गेल्या तीन चार दिवसांपासून या घडामोडी सुरू होत्या. आज सकाळी ते आपल्या समर्थकांसमवेत मुंबईत जाऊन त्यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रवाना झाले. मुंबईत उद्या (बुधवारी) सकाळी अकरा वाजता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बॅंकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सातारा जावलीत मोठे खिंडार पडणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA ShivendraSinghRaje Bhosale resigns MLA Post