गडहिंग्लजला राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

गडहिंग्लज - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चंदगड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चार गट व त्याअंतर्गत आठ गणातील इच्छुकांनी आज अर्ज सादर केले. हलगीचा कडकडाट, कैचाळचा नाद आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

गडहिंग्लज - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चंदगड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चार गट व त्याअंतर्गत आठ गणातील इच्छुकांनी आज अर्ज सादर केले. हलगीचा कडकडाट, कैचाळचा नाद आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील, तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार, गोकुळचे संचालक रामराज कुपेकर, संघटक उदयराव जोशी, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, सभापती मीनाताई पाटील, उपसभापती तानाजी कांबळे यांच्यासह तालुक्‍यातून हजारो कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते. महिलांची संख्याही लक्षणीय होती. संकेश्‍वर रोडवरील पक्ष कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तेथून शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरून ही शक्तिप्रदर्शनाची मिरवणूक तहसील कार्यालयाजवळ आली. तेथे श्रीमती कुपेकर यांच्या उपस्थितीत प्रत्येक गटातील व गणातील इच्छुकांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर-चौगुले, सहायक अधिकारी राजेश चव्हाण यांनी अर्ज स्वीकारले. 

पक्ष चिन्हाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी केली. उघड्या जीपमधून आमदार श्रीमती कुपेकर, श्री. पाटील, श्री. करिगार सहभागी झाले होते. हलकर्णी, बड्याचीवाडी, नेसरी, भडगाव गट व त्याअंतर्गत येणाऱ्या बड्याचीवाडी, नूल, हलकर्णी, बसर्गे, महागाव, भडगाव, नेसरी, बुगडीकट्टी या आठ गणातील इच्छुकांनी अर्ज सादर केले. 

दरम्यान, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व जनता दल आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीबाबतही चर्चा सुरू असून अद्याप कोणत्याही आघाडीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. उद्या (ता. 6) पक्षाचे ए. बी. फॉर्म देण्याचा अखेरचा दिवस असल्याने कोणत्या घडामोडी होतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. आघाडी झालीच नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Ncp rally in gadhinglaj