साताऱ्यात राष्ट्रवादीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषदेत निर्विवाद सत्ता, कॉंग्रेसची धुळधाण, भाजपचा शिरकाव

जिल्हा परिषदेत निर्विवाद सत्ता, कॉंग्रेसची धुळधाण, भाजपचा शिरकाव
सातारा - जिल्हा परिषदेच्या 39 जागा व दहा पंचायत समित्यांवर सत्ता मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्विवादपणे चौथ्यांदा गड राखला. भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण राजकारणात शिरकाव झाला, तर कॉंग्रेसची पुरती धुळधाण उडाली. सत्ता मिळाली असली, तरी काही गटांत राष्ट्रवादीच्या मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले. कऱ्हाड तालुक्‍यात राष्ट्रवादीची, तर माणमध्ये जयकुमार गोरेंची वाताहात झाली.

मुख्यमंत्र्यांसह महसूल व अर्थमंत्र्यांनी सभांचा धडाका लावून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी जंग जंग पछाडले. राष्ट्रवादीसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आणि अस्तित्व पणाला लावणारी होती. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी बंडखोरी टाळण्यासह सर्व ती काळजी घेत आखलेली रणनीती बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यात कारणीभूत ठरली.

सातारा तालुक्‍यात शिवेंद्रसिंहराजे निर्विवाद यश मिळवतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, खासदार उदयनराजेंनी भाजपसोबत हातमिळवणीची केलेली खेळी जिल्हा परिषदेच्या पाच गटांत विजय मिळविणारी ठरली. जावळीत पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादीने एकहाती मिळविल्या. मात्र, अंतर्गत कुरघोड्यांमुळे कुडाळ गटातून आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. वाईत माजी आमदार मदन भोसले यांच्या गैरहजेरीमुळे कॉंग्रेसवर नामुष्कीची वेळ आली.

जिल्हा परिषदेच्या चारही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. कॉंग्रेसला केवळ पंचायत समितीच्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

महाबळेश्‍वरमध्ये पुरस्कृत उमेदवारांच्या रूपाने शिवसेनेने जिल्हा परिषदेत शिरकाव केला. खंडाळ्यात सर्व पक्षांनी मिळून नितीन भरगुडे पाटील यांची सद्दी संपली. अपक्ष उमेदवार उदय कबुले यांनी तब्बल साडेसहा हजारांच्या मताधिक्‍याने त्यांना धूळ चारली. पंचायत समितीवर मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली. तीनही गटांतील यशामुळे आमदार मकरंद पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.

अंतर्गत बंडाळीत रमल्यामुळे कोरेगाव तालुक्‍यात कॉंग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला. पक्षाला भीमराव पाटील यांच्यामुळे जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितीच्या दोन जागांमुळे कशीबशी लाज राखता आली. आमदार शशिकांत शिंदेंनी चार गट व सात गणांमध्ये विजय मिळवून कोरेगावात आपली मांड पक्की बसवली. फलटणमध्ये रामराजेंचा करिष्मा कायम राहिला. त्यांनी सहा गट आणि 12 गणांत सत्ता मिळविली. अंतर्गत तडजोडीतून कॉंग्रेसला एक गट व दोन गणांवर समाधान मानायला लावले.

माण तालुक्‍यात "जय हो'चा नारा या वेळी काही घुमला नाही. शेखर गोरेंची गुलालाशी गाठ पडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेणारे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे मात्र शेखर यांच्या आक्रमकतेपुढे चारीमुंड्या चित झाले. जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बाळगणारे आमदार गोरे केवळ एका गटापुरतेच मर्यादित राहिले. (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना दोन गटांतून निवडून आल्या.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनिल देसाई यांनाही केवळ एका गटावरच वर्चस्व मिळविता आले.

खटावमध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना स्वत:च्या पत्नीची जागा राष्ट्रवादीअंतर्गत कुरघोडीमुळे गमवावी लागली. भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा तालुक्‍यातील प्रभाव संपल्याचे या निवडणुकीने स्पष्ट केले. भाजपला एकाही गटावर सत्ता मिळविता आली नाही. कॉंग्रेसलाही जिल्हा परिषदेच्या एका व पंचायत समितीच्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

कऱ्हाड तालुक्‍यात राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांना हा मोठा धक्का आहे. बारा गटांपैकी केवळ तीनच जागा त्यांना जिंकता आल्या. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीवर भाजप व उंडाळकर आघाडी भारी पडली. दोघांचे मिळून जिल्हा परिषदेच्या सहा, तर पंचायत समितीच्या 13 जागा मिळाल्या. त्यामुळे कऱ्हाड पंचायत समितीत सत्तांतर होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची कऱ्हाडबरोबर जिल्ह्यातही वाताहात झाली.

पाटणमध्ये माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर पंचायत समितीची सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले, तर येथील चार गटांवरही त्यांनी विजय मिळविला. पाटणमध्ये मीच या मनोभूमिकेतून आमदार शंभूराज देसाई यांनी आपल्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला माती चारली. त्यांनी तीन गट व सहा गणांवर आपले अस्तित्व कायम राखले. आमदार नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील यांनी मंद्रुळ कोळे गटात विजय मिळवून जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला.

तालुकानिहाय बलाबल
पंचायत समित्यांतील एकूण जागा : 128
राष्ट्रवादी 76, कॉंग्रेस 15, भाजप 13, शिवसेना 6, अपक्ष 2, रासप 1, साविआ 6, कविआ 7, पाविआ 2.

Web Title: ncp in satara zp