तासगावातील गुंडगिरीला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सांगली - तासगावमध्ये भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा पूर्ण ताकदीने विरोध राहील. तेथील गुंडगिरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत की कसे? ते लवकरच पहायला मिळेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सांगली - तासगावमध्ये भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा पूर्ण ताकदीने विरोध राहील. तेथील गुंडगिरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत की कसे? ते लवकरच पहायला मिळेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सांगली दौऱ्यावर आलेल्या श्री. तटकरे यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यातील फुटाणे सरकारच्या विरोधात 1 डिसेंबरपासून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. सरकारने बोंडअळीप्रकरणी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, परंतू अद्याप दिली नाही. 34 हजार शेतकऱ्यांना 89 लाख कोटी कर्जमाफी जाहीर केली. बँकेला वेठीस धरले. मात्र अद्याप खात्यावर पैसे जमा केले नाहीत. ओटीएसबाबतचे धोरण दुर्दैवी आहे. संभाजी पाटील-निलंगेकरांच्या 78 कोटी कर्जासाठी 53 कोटीची सवलत दिली. मात्र शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन सुरू केले. संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. 'मेक इन इंडिया' ची घोषणा फसवी ठरली. आता मॅग्नेटिक महाराष्ट्रातून पुन्हा तोच उद्योग सुरू आहे.'' 

शिवसेनेवर निशाणा साधताना श्री. तटकरे म्हणाले, "अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा प्रकार दुर्दैवी होता. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांनी त्याला मुकसंमती दिली ती दुर्दैवी वाटते. मुख्यमंत्र्याच्या धाकामुळे की डरपोकमुळे असा प्रश्‍न आहे. एसटी च्या खासगीकरणाचा डाव सुरू आहे. प्राथमिक शिक्षण, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. आम्ही वर्षाला 55 हजार पदांची भरती करत होतो. परंतू सध्या अडीच ते तीन लाख पदे रिक्त आहेत. रिक्त पदे ठेवून ती रद्द करण्याचा सरकारचा डाव आहे. युवक-युवतीमध्ये गोंधळ निर्माण केला आहे. शिक्षण तावडेंच्या तावडीत सापडले आहे. हल्लबोल आंदोलनाच्या निमित्ताने सरकारविरोधात संताप सर्वत्र पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रथमच हस्तक्षेप झालेला पहायला मिळाले. मात्र भाजपला त्यांची जागा दाखवली जाईल.'' 

तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी विचारले असता श्री. तटकरे म्हणाले, "भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आम्ही पूर्ण ताकदीने विरोध करू. सरकार त्यांचेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या खात्याला हे आव्हानच आहे. मात्र त्यांचा आशीर्वाद की कसे हे पुढील काळात पहायला मिळेल.'' 

नालायकांमध्ये त्यांचे 12 मंत्री - 
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी शिवसेनेने अजितदादांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मागे एकदा सरकारमध्ये असताना सरकार नालायक आहे अशी टीका केली. आता या नालायक सरकारमध्ये त्यांचे 12 मंत्री असताना केलेल्या टीकेला दुतोंडी म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे. अजितदादांनी शिवसेनेचे खरे स्वरूप उघड केल्यामुळे आता पुन्हा टीका केली जाते असेही श्री. तटकरे म्हणाले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: NCP state president criticized BJP government in sangli