हातकणंगले, करवीरवर राष्ट्रवादीचा डोळा

निवास चौगले
मंगळवार, 10 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत हातकणंगले, करवीर व शिरोळ तालुक्‍यांतील काही मतदारसंघांत राष्ट्रवादीशी भाजपसह त्यांचे मित्र असलेल्या पक्षांची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. शाहूवाडीतही जनसुराज्य की शिवसेनेसोबत जायचे यावर प्राथमिक चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत हातकणंगले, करवीर व शिरोळ तालुक्‍यांतील काही मतदारसंघांत राष्ट्रवादीशी भाजपसह त्यांचे मित्र असलेल्या पक्षांची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. शाहूवाडीतही जनसुराज्य की शिवसेनेसोबत जायचे यावर प्राथमिक चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची भाजपशी आघाडी झाली तर आश्‍चर्य वाटू नये, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी काल (ता. ८) पत्रकार परिषदेत केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेध घेतला असता राष्ट्रवादीसोबत माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री जयवंतराव आवळे, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचा गट हातकणंगलेत एकत्र येण्याची शक्‍यता आहे. माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांना विरोध म्हणून हे सूत्र जमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

हातकणंगले तालुक्‍यात गेल्या निवडणुकीत श्री. आवळे यांनी श्री. आवाडे यांच्या उमेदवारांना काँग्रेसचे चिन्हही मिळवून दिले नव्हते. श्री. आवाडे यांचे उमेदवार टीव्ही चिन्हावर लढले. इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीत श्री. आवाडे यांनी श्री. आवळे यांच्या मुलाला काँग्रेसची उमेदवारी मिळू दिली नाही. माजी आमदार महादेवराव महाडिक व श्री. आवाडे यांच्यात विधान परिषदेपासून मतभेद आहेत. 

आमदार हाळवणकर हेही आवाडेंच्या विरोधात आहेत. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अरुण इंगवले भाजपवासीय झाले आहेत. या सर्व विरोधकांची एकत्र आघाडी हातकणंगले तालुक्‍यात होऊ शकते. त्यात राष्ट्रवादी सहभागी होण्याची शक्‍यता आहे. 

करवीरमध्ये राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चा केली; पण त्याला नकार मिळाला. करवीरमध्ये महाडिक गटाला मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघात भाजपचीही फारशी ताकद नाही. त्यामुळे भाजपच्या आहे त्या मतदारांबरोबरच महाडिक व काँग्रेस विरोधकांना एकत्र घेऊन ही आघाडी होण्याची शक्‍यता आहे.

करवीरमध्ये गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ११ पैकी एकही जागा मिळाली नाही. तो वचपा या वेळी काढण्यासाठी खासदार धनंजय महाडिकच सक्रिय झाले आहेत. 

शिरोळमधील काँग्रेस व राष्ट्रवादीतील दिग्गज नेते आजच भाजपत गेले. त्यामुळे राष्ट्रवादीला नांदणी, आलास यासारख्या मतदारसंघात ‘अंडरस्टॅंडिंग’ करून निवडणूक लढवावी लागेल. आलास हा विद्यमान सदस्य धैर्यशील माने यांचा गट आहे.

१३ गावांमुळे आवळे आक्रमक
हातकणंगले तालुक्‍यात विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यातील हातकणंगले मतदारसंघात तालुक्‍यातील १३ गावे येतात. ज्या त्या तालुक्‍याच्या माजी किंवा विद्यमान आमदारांनीच शिफारस केलेल्या उमेदवाराला काँग्रेसचे तिकीट देण्याची परंपरा आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी श्री. आवाडे यांचे असलेले मतभेद पाहता श्री. आवळे सांगतील तेच उमेदवार निश्‍चित होतील. त्यामुळेच आवळे आक्रमक आहेत.

राहुल आवाडे रेंदाळमधून?
माजी राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे रेंदाळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नगरपालिका निवडणुकीत त्यांचे मतदान इचलकरंजी शहरात होते. ही निवडणूक लढवण्यासाठी अलीकडेच त्यांचे मतदान चंदूर गावात नोंदवल्याचे समजते. पण ग्रामीणमधील १३ गावे ही श्री. आवळे यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचा राहुल यांच्या उमेदवारीला विरोध असेल, किंबहुना नगरपालिका निवडणुकीतील मुलाला डावलल्याचा वचपाही श्री. आवळे यांच्याकडून काढला जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: ncp watch on hatkanangale & karvir