भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान व आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्‍त केला. 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी आलो असल्याची भाषा करत आहेत, असे संविधान विरोधी आणि मनुस्मृती धारक सरकार गेल्या शिवाय राहणार नाही, असा विश्‍वास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान व आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्‍त केला. 

शाहू स्मारक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, अश्‍विनी माने व आशा भिसे (लातूर), विना खरे, सोनाली देशमुख (परभणी), राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा संगिता खाडे, जहीदा मुजावर आदी उपस्थित होत्या. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव या अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा भाग म्हणून पुणे येथे 29 तारखेला पश्‍चिम महाराष्ट्रातील महिला राष्ट्रवादीच्या महिलांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

फौजिया खान म्हणाल्या, देशात संविधानावर हल्ला केला जात आहे. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे आवश्‍यक आहे. आज देशातील महिला सुरक्षित नाहीत, हे भीषण वास्तव आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ होत असून हे चिंताजनक आहे. तर यापेक्षाही चिंताजनक म्हणजे भाजपच्या 20 आमदारांवर बलात्काराचे गुन्हे नोंद होणे, हे आहे. 

मनुस्मृती जाळण्यावरुन झटापट 
मनुस्मृती जाळण्यावरुन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा फौजीया खान, आमदार विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर महिला पदाधिकारी व पोलिस यांच्यात झटापट झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार झाल्याबददल त्यांनी निषेध व्यक्‍त केला.  

Web Title: NCP womens congress press conference