'स्थायी'च्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या संगीता हारगे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सांगली : कॉंग्रेसचे बंडखोर सदस्य आणि स्वाभिमानीच्या मदतीने राष्ट्रवादीच्या संगीता हारगे यांची स्थायी समितीच्या सभापतिपदी निवड झाली. सत्ताधारी कॉंग्रेसला मोठा दणका बसला असून पुढील वर्षभरात अमृत योजनेच्या 103 कोटींच्या निविदा निघणार असल्याने सभापतिपदाला मोठा "अर्थ' प्राप्त झाला आहे. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी मोठी चुरस झाली. कॉंग्रेसचे 9, राष्ट्रवादीचे 5, तर स्वाभिमानीचे 2 सदस्य असे बलाबल आहे. कॉंग्रेसकडून सांगलीवाडीचे नगरसेवक दिलीप पाटील यांनी आज अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी वेळेत येऊनही अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल कॉंग्रेसचे नगरसेवक निर्मला जगदाळे व प्रदीप पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संगीता हारगे यांची उमेदवारी निश्‍चित होती. कॉंग्रेस नगरसेवकांचा बंडाचा पवित्रा कायम राहिला.

दरम्यान, आज सकाळी निवडीसाठी सभागृहात सदस्य हजर झाले. बंडखोर सदस्य प्रदीप पाटील आणि अतहर नायकवडी अनुपस्थित राहिले. त्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ कमी झाली. 7 सदस्यांपैकी निर्मला जगदाळे यांनी उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केले. तर स्वाभिमानीच्या दोघा सदस्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला 6 आणि राष्ट्रवादीला 8 असे मतदान झाले. कॉंग्रेसचे अल्पमत झाल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विजयाचा शिक्कामोर्तब करण्यात आला. हा सात्ताधारी कॉंग्रेसला मोठा दणका आहे.

Web Title: NCP's Sangita Harge chairman of Sangli's permanent house